नागपूर : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगाव शिवारातील चाकडोह येथे सोलर एक्सप्लोसिव्ह लिमिटेड या दारूगोळा उत्पादन करणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी मोठा स्फोट झाला. यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला.
हा स्फोट इतका भीषण होता की,कामगारांच्या शरीराचा अक्षरशः कोळसा झाला. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटविणे कठीण असल्याने डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. पाेलिसांनी घटनास्थळाहून चार मृतदेह, दाेन धड आणि शरीराच्या अवयवांचे १८ विविध भाग ताब्यात घेतले आहेत. मृतदेह ओळख पटण्याच्या स्थितीत नसल्याची माहिती पाेलिस अधीक्षक हर्ष पाेद्दार यांनी दिली.
नागपूर (ग्रामीण) पाेलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यात त्यांना ६० ते ८० टक्के असलेले चार मृतदेह, दाेन धड व शरीराचे १८ वेगवेगळे भाग आढळले. ते सर्व शवविच्छेदन व तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.