Published On : Wed, Jan 1st, 2020

धावत्या रेल्वेत नागपुरातील तंत्रज्ञाची बॅग लंपास

– दागिने, मोबाईलवर हातसाफ,सेवाग्राम, संपर्कक्रांती आणि दाणापूर एक्स्प्रेसमधील घटना

नागपूर: मावळत्या वर्षाला निरोप आणि नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी देशभरात तयारी सुरू असताना मात्र, थर्टीफस्र्टलाही चोरांनी सुटी घेतली नाही. प्रवासादरम्यान साखर झोपेचा फायदा घेत अनेकांचे दागिने, मोबाईल, कपडे आणि पैशावर हातसाफ केला. या तीन घटना मंगळवारी सेवाग्राम, संपर्कक्रांती आणि दाणापूर एक्स्प्रेसमध्ये उघडकीस आल्या. लोहमार्ग पोलिसांनी या घटनांची नोंद केली आहे.

राणी कोठी, निवासी वसंतलाल मिश्रा हे डीआरडीओ येथे वरिष्ठ तंत्रज्ञ आहेत. ते कुटुंबीयांसह मुंबईला गेले होते. परतीचा प्रवास त्यांनी १२१३९ सेवाग्राम एक्स्प्रेसच्या एस-४ डब्यातून केला. साखर झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग लंपास केली. बॅगमध्ये ५ हजार रुपये, कपडे, वाहन परवाना आणि सौदर्यप्रसाधनाचे साहित्य होते.

पहाटेच्या सुमारास याच बोगीतील एक प्रवासी आपली बॅग शोधत होता. बॅग दिसत नसल्याने त्यांनी जवळच्या प्रवाशांना विचारपूस करीत असतानाच मिश्रा यांनी आपलीही बॅग तपासली असता बॅग दिसून आली नाही. लगेच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी येताच लोहमार्ग पोलिसांनी गाडीतच त्यांची तक्रार नोंदविली.

दुसरी घटना हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये घडली. या गाडीत बंधूनगरातील अपर्णा शर्मा (६५) या बी३-१ बर्थवरून नागपुरला येत होत्या. त्या साखर झोपेत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगमधून लहान पर्स मधील सोन्याचे दागिने लंपास केले. या पर्स मध्ये सात जोडी कानातले आणि १० हजार रुपये रोख होती.

तिसरी घटना दाणापूर -सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये उघडकीस आली. सुधीर पानवलकर (६५, रा. मनीषनगर ) हे एस-९ डब्यातील २५ क्रमांकाच्या बर्थहून प्रवास करीत होते. त्यांनी आपला मोबाईल चार्जिंगवर लावला. अज्ञात चोरट्याने त्यांचा चार्जिंगवरील मोबाईल लंपास केला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.