नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधील एका बेवारस बॅगेतून ४ किलो १५० ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे २ लाख ७ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईत आरपीएफच्या अमली पदार्थ शोधी श्वान ‘प्रिन्स’ याने महत्त्वाची भूमिका बजावली.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील आरपीएफ गुन्हे गुप्तवार्ता शाखेचे पथक नागपूर रेल्वे स्थानकावर गुन्हे प्रतिबंध आणि देखरेखीसाठी तैनात होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दाखल झाली. यावेळी पादचारी पुलाच्या जिन्याजवळ एक बेवारस बॅग आढळून आली.
बॅगेच्या मालकाचा बराच वेळ शोध घेण्यात आला, मात्र कोणीही समोर आले नाही. त्यानंतर अमली पदार्थ शोधी श्वान ‘प्रिन्स’ याच्या मदतीने बॅगेची तपासणी करण्यात आली. श्वानाने संशय व्यक्त केल्यानंतर बॅग उघडून पाहिली असता खाकी टेपमध्ये गुंडाळलेली दोन पाकिटे आढळली. त्यामध्ये ४ किलो १५० ग्रॅम गांजा असल्याचे निष्पन्न झाले.
आरपीएफने मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, हा गांजा कोणाचा आहे आणि तो रेल्वेमार्गे कोणी आणला याचा तपास सुरू आहे.





