Published On : Tue, Mar 26th, 2019

नागपूर-रामटेकमधील प्रमुख उमेदवार कोट्यधीश

Advertisement

नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसकडून माजी खासदार नाना पटोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर रामटेकमधून शिवसेनेकडून कृपाल तुमाने व काँग्रेसकडून किशोर गजभिये यांनी अर्ज दाखल केला आहे. या चौघांनीही शपथपत्रात मालमत्तेची विस्तृत माहिती दिली आहे. या माहितीनुसार हे चौघेही प्रमुख उमेदवार कोट्यधीश आहेत.

नितीन गडकरी
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदीमंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक शपथपत्रात संपत्तीचे विस्तृत विवरण दिले आहे. त्यानुसार गडकरी, त्यांच्या पत्नी कांचन व कुटुंबीयांच्या नावे मिळून एकूण साडेसोळा कोटींची अचल संपत्ती आहे. तर सव्वादोन कोटींहून अधिकची चल संपत्ती आहे. सोबतच कुटुंबीयांवर एकूण चार कोटींहून अधिकचे कर्ज आहे.शपथपत्रातील माहितीनुसार गडकरी व त्यांच्या कुटुंबीयांकडे मिळून २ कोटी २७ लाख ४५ हजार ७७५ रुपयांची चल संपत्ती आहे. यात २१ लाख ८५ हजार २८४ रुपयांचे ‘बँक डिपॉझिट्स’, २३ लाख ७१ हजार रुपयांची गुंतवणूक, ४६ लाख ७६ हजार ६०९ रुपयांची वाहने तर ५३ लाख ६१ हजार ६३० रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे. अचल संपत्तीमध्ये २ कोटी १३ लाख ४० हजारांची धापेवाडा येथे शेतजमीन, वरळी येथील सव्वाचार कोटी चालू बाजारमूल्य असलेला फ्लॅट, ६ कोटी १६ लाखांची महाल येथील वडिलोपार्जित जागा, धापेवाडा येथील ४२ लाखांचे वडिलोपार्जित घर तसेच ४४ लाखांचे आणखी एक घर, उपाध्ये मार्ग येथील ३ कोटी ९ लाखांचे घर यांचा समावेश आहे. गडकरी व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे एकूण १६ कोटी ५१ लाख ७० हजार ३०० रुपयांची अचल संपत्ती आहे. तर कुटुंबीयांवर ४ कोटी ७२ लाख रुपयांचे कर्ज आहे. केवळ नितीन गडकरी यांच्या नावे ६९ लाख ३८ हजार ६९१ रुपयांची चल संपत्ती व सव्वाचार कोटींची अचल संपत्ती आहे.

तीन न्यायालयीन प्रकरणे
दरम्यान, गडकरी यांच्याविरोधात विविध प्रकारचे चार गुन्हे आहेत व यातील तीन प्रकरणांत न्यायालयीन खटले सुरू आहेत.

नाना पटोले
काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार पटोले, त्यांच्या पत्नी व कुटुंबीयांच्या नावे मिळून सव्वा कोटींहून अधिकची चल संपत्ती असून ८२ लाखांहून अधिक अचल संपत्ती आहे. शपथपत्रातील माहितीनुसार पटोले व कुटुंबीयांकडे मिळून एकूण १ कोटी ३८ लाख ८५ हजार ५०४ रुपयांची चल संपत्ती आहे. यात २५ लाख ६ हजार ६४४ रुपयांचे ‘बँक डिपॉझिट्स’, ९४ लाख ७६ हजार ७५० रुपयांची गुंतवणूक, ५ लाख १९ हजार ५७१ रुपये किंमत असलेली वाहने तर १३ लाख ५६ हजार रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे. अचल संपत्तीमध्ये सुकळी येथील ३.३७ एकर शेती, महालगाव येथील १४.४७ एकर शेती अशी एकूण ४२ लाखांची कृषी जमीन आहे. याशिवाय बेला येथे १२ लाखांची जागा, भामटी येथे २८ लाख ७५ हजार बाजारमूल्याचे दोन फ्लॅट्स यांचा समावेश आहे. पटोले व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे एकूण ८२ लाख ७५ हजार रुपयांची चल संपत्ती आहे.
केवळ नाना पटोले यांच्या नावे ६८ लाख ७१ हजार १८४ रुपयांची चल संपत्ती व ४१ लाख ७५ हजार रुपयांची अचल संपत्ती आहे.

चार न्यायालयीन प्रकरणे
दरम्यान, पटोले यांच्याविरोधात विविध प्रकारचे चार गुन्हे आहेत व या प्रकरणांत न्यायालयीन खटले सुरू आहेत.

कृपाल तुमाने
रामटेक मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या कुटुंबीयांच्या नावे पावणेनऊ कोटींहून अधिकची अचल संपत्ती असून, ७० लाखांहून अधिकची चल संपत्ती आहे. शपथपत्रातील माहितीनुसार, तुमाने व कुटुंबीयांकडे मिळून एकूण ७० लाख ४१ हजार १६५ रुपयांची चल संपत्ती आहे. यात ३७ लाख ५४ हजार ३७३ रुपयांचे ‘बँक डिपॉझिट्स’, १७ लाख ३५ हजार ७९२ रुपयांची गुंतवणूक, ११ लाख ५० हजार रुपये किंमत असलेली वाहने तर ३ लाख रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे. अचल संपत्तीमध्ये हिंगण्यातील लाडगाव (३.६९ हेक्टर), मौद्यातील नवेगाव (१.४८ हेक्टर), नागपुरातील पारडी (०.३० हेक्टर) येथील शेतजमीन आहे. याचे चालू बाजारमूल्य ५ कोटी २८ लाख ६२ हजार रुपये इतके आहे. याशिवाय हिंगण्यातील वाघधरा, नागपुरातील नवी शुक्रवारी व तारसा येथील ८७ लाख रुपये किमतीची बिगरशेतजमीन आहे. सोबतच सोमलवाडा येथे १ कोटी ६० लाख रुपये किमतीची तर सक्करदरा येथे १ कोटी १० लाख रुपये किमतीची इमारत आहे. केवळ तुमाने यांच्या ६ कोटी ९८ लाख ७४ हजार ५०० रुपयांची अचल संपत्ती व ४९ लाख ५० हजार ७३१ रुपयांची चल संपत्ती आहे.

किशोर गजभिये
रामटेक मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार किशोर गजभिये यांच्या कुटुंबीयांच्या नावे ३५ लाख ७० हजार ४२४ रुपयांची चल संपत्ती आहे, तर सव्वासात कोटींहून अधिक मूल्य असलेली अचल संपत्ती आहे. शपथपत्रातील माहितीनुसार, गजभिये व कुटुंबीयांकडे मिळून एकूण ३५ लाख ७० हजार ४२४ रुपयांची चल संपत्ती आहे. यात २ लाख ९० हजार रुपयांचे ‘बँक डिपॉझिट्स’, ४ लाख ४२ हजार १३ रुपयांची गुंतवणूक, २३ लाख ५० हजार रुपये किमतीची वाहने व साडेचार लाखांच्या दागिन्यांचा समावेश आहे. अचल संपत्तीमध्ये रोहनखेडा येथील ८ लाख रुपये बाजारमूल्य असलेली शेतजमीन, बेझनबाग येथील १ कोटी बाजारमूल्य असलेली बिगरशेतीजमीन, नेरळ व मुंबईतील बांद्रा येथील एकूण ६ कोटी २२ लाख किमतीचे फ्लॅट्स यांचा समावेश आहे. फक्त गजभिये यांच्या नावे ७ कोटी २६ लाख रुपयांची अचल व २९ लाख ५९ हजार ४२४ रुपयांची चल संपत्ती आहे.