Published On : Tue, Aug 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात रक्षाबंधनानिमित्त मध्यवर्ती कारागृहातील बंदींच्या कलाकुसरीला मिळाली बाजारपेठ!

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन
Advertisement

नागपुरात रक्षाबंधनानिमित्त मध्यवर्ती कारागृहातील बंदींच्या कलाकुसरीला मिळाली बाजारपेठ!

नागपूर : रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील महिला व पुरुष बंदींनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन मंगळवारी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारागृहातील २७० बंदींनी विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांना कौशल्य प्रमाणपत्रांचेही वाटप करण्यात आले.

कारागृह विभागाचे ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे ब्रीदवाक्य असून, बंदींना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने कारागृहात लोहारकाम, विणकाम, सुतारकाम, बेकरी, हातमाग, यंत्रमाग, धुलाईगृह, वाहन धुलाई केंद्र यांसह विविध उद्योग सुरू आहेत. या उद्योगांमध्ये बंदींना प्रशिक्षणासोबतच कामाचा मोबदला दिला जातो.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रक्षाबंधन, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यंदाही बंदींनी तयार केलेल्या वस्तू नागरिकांसाठी विक्रीस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रहाटे कॉलनी येथील वर्धा मार्गावरील मेट्रो स्थानकाजवळ, कारागृह परिसरात हे विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. येथे महिला बंदींनी तयार केलेल्या आकर्षक राख्यांसह हातमागावरील साड्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शोभेच्या वस्तू, दऱ्या, आसनपट्ट्या, कपडे, चादरी, टॉवेल आणि रुमाल आदी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

हे विक्री केंद्र नागरिकांसाठी दररोज सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. कारागृहातील बंदींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तू खरेदी करून त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला समाजाने हातभार लावावा, असे आवाहन कारागृह प्रशासनाने केले आहे.

Advertisement

यावेळी बोलताना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बंदींनी तयार केलेल्या वस्तूंचे कौतुक केले. कारागृहातील शिक्षा ही केवळ शिक्षा न राहता व्यक्तीला सुधारण्याची आणि नव्याने उभे राहण्याची संधी ठरावी, यासाठी कौशल्य प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. भूतकाळ बदलता येत नसला तरी भविष्य घडविता येते. त्यामुळे कारागृहातून बाहेर पडल्यानंतर स्वावलंबी आणि सुजाण नागरिक म्हणून समाजात पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करा, असा संदेश त्यांनी बंदींना दिला.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून बंदींना शिवणकाम, सुतारकाम, हस्तकला, बेकरी, सौर पॅनेल तंत्रज्ञ, सहाय्यक इलेक्ट्रिशियन, स्वयंपाक आणि गृहव्यवस्थापन आदी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात २७० बंदींनी सहभाग घेतला आणि प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यातील उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना पोलीस आयुक्तांच्या हस्ते कौशल्य प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

‘आज आम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी कुटुंबीयांपासून दूर असलो, तरी आमच्या हातांनी तयार केलेल्या राख्या आणि वस्तूंच्या माध्यमातून अनेक कुटुंबांमध्ये हा सण साजरा होणार आहे,’ असा भावनिक संदेश या उपक्रमातून बंदींनी दिला.

कार्यक्रमाला नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वैभव सु. आगे, अतिरिक्त अधीक्षक दीपा आगे, तसेच कारागृहातील अधिकारी-कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा आगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अधीक्षक वैभव आगे यांनी केले.

नागरिकांनी रक्षाबंधन मेळाव्याला भेट देऊन बंदी बांधवांच्या कलाकुसरीच्या वस्तू खरेदी कराव्यात आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कारागृह प्रशासनाने केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.