Published On : Mon, Jul 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पोलिसांनी ४२ लाखांचे २२१ चोरी झालेले मोबाईल मालकांच्या केले स्वाधीन!

Advertisement

नागपूर : हरवलेला मोबाईल पुन्हा मिळेल, अशी आशा अनेकजण सोडून देतात. मात्र नागपूर शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या प्रभावी कामगिरीतून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. परिमंडळ क्रमांक ५ अंतर्गत शोधमोहीम राबवत तब्बल ४१ लाख ९८ हजार ५४ रुपयांचे २२१ हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात आले असून ते त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी नागपूर पोलिसांचे मनापासून आभार मानत समाधान व्यक्त केले.

रविवारी (६ जुलै) दुपारी पारडी पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात मोबाईल मालकांना त्यांचे फोन परत देण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत कळमना पोलीस ठाण्याने ७७ मोबाईल (१६.२० लाख रुपये), यशोधरानगर पोलीस ठाण्याने ३१ मोबाईल (५.५४ लाख रुपये), पारडी पोलीस ठाण्याने ४० मोबाईल (६.६० लाख रुपये) आणि वाठोडा पोलीस ठाण्याने ७३ मोबाईल (१३.६४ लाख रुपये) शोधून काढले. अशाप्रकारे एकूण २२१ मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले.

यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तात्काळ CEIR पोर्टलवर नोंदणी करून मोबाईल ब्लॉक करावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. त्यामुळे मोबाईलचा गैरवापर रोखण्यास मदत होते आणि तो परत मिळण्याची शक्यता वाढते.

Advertisement

याचबरोबर नागरिकांनी बेकायदेशीर गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत किंवा इतर अवैध प्रकारांची माहिती डायल ११२ वर देऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या उपस्थितीत पार पडली. परिमंडळातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, मोबाईल मिसिंग पथक आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही यशस्वी मोहीम राबविण्यात आली.

कार्यक्रमाला सुमारे ३०० नागरिक आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अनेकांनी हरवलेले किंवा चोरीस गेलेले मोबाईल पुन्हा हातात मिळाल्याने नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत आनंद व्यक्त केला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.