ध्वनी प्रदूषण टाळण्याचे नागरिकांना आवाहन
नागपूर : अनेकांना कर्कश हॉर्न हा त्रासदायक वाटतो. रुग्णालय आणि शाळा अशा शांतता हवी असलेल्या ठिकाणी हॉर्ण वाजवण्यास बंदी आहे. तरी देखील काही वाहन चालक आवश्यकता नसतानाही मोठ्याने हॉर्न वाजवतात.नागपुरात मात्र विनाकारण हॉर्न वाजवण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शहारात ध्वनी प्रदूषण वाढत चालले आहे.
यापार्श्वभूमीवर आज नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वात शहरात आज ‘नो हॉँकिंग डे’ मोहिम राबविण्यात आली. याकरिता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सीपी सिंगल स्वतः ‘नो हॉर्न’चा बोर्ड घेऊन रस्त्यावर उतरले. डॉ. रवींद्र सिंगल यांनी नागपूरच्या गजबजलेल्या रस्त्यांवरील वाढलेले ध्वनी प्रदूषण यामुळे सतत वाहनांच्या हॉर्न वाजवण्यामुळे होणाऱ्या त्रासावर प्रकाश टाकला.पोलीस विभागाकडून शहरात ठिकठिकाणी ही मोहीम राबविण्यात असून विशेषत: रुग्णालये आणि शाळांसारख्या संवेदनशील भागात हॉर्नचा होणाऱ्या सतत वापराकडे पोलीस प्रशासन लक्ष ठेवणार आहे, असे डॉ. सिंगल म्हणाले.