Published On : Tue, Jun 26th, 2018

नागपुरात कुख्यात पिन्नू पांडेवर गोळीबार

नागपूर : गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील वैमनस्याचे पर्यवसान एका कुख्यात गुन्हेगारावर गोळीबार करण्यात झाले. दुचाकीवर आलेल्या गुंडांनी कुख्यात पिन्नू पांडेवर पाच गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी पिन्नूच्या मांडीला लागली. तर, दोन गोळ्या अन्य दोघांना लागल्या. त्यातील एका जखमीचे नाव मोहनलाल धुरिया आहे. तिसऱ्या जखमीचे नाव स्पष्ट होऊ शकले नाही. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेन्शननगर चौकात मंगळवारी सायंकाळी ४.३० ते ५ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

जखमी पिन्नू पांडे हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. शहरातील अनेक गुन्हेगारांसोबत त्याचे वैमनस्य आहे. त्यांच्यात वाद, हल्लेही झालेले आहे. काही दिवसांपूर्वीच पिन्नू कारागृहातून बाहेर आला. मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पिन्नू पेन्शननगर चौकातील अक्सीस बँकेच्या एटीएमसमोर साथीदारांसह उभा होता. तेवढ्यात दुचाकीवर आलेल्या दोघांनी पिन्नूच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी पिन्नूच्या जांघेत लागली. त्यामुळे तो खाली पडला. दुसरी एक गोळी तेथून जात असलेल्या धुरिया नामक व्यक्तीला लागली. त्यामुळे पिन्नूसोबत धुरियादेखील गंभीर जखमी झाला. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती कळताच गिट्टीखदान तसेच गुन्हे शाखा पोलिसांचा ताफा तिकडे धावला. पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनीही घटनास्थळी आणि नंतर पोलीस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तोपर्यंत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तीन दिवसांपासून भांडण सुरू

गोळीबार नेमका कुणी केला. ते रात्री ९ वाजतापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. मात्र, शहरातील कुख्यात गुंड सुमित ठाकूर याच्या सांगण्यावरून त्याच्या हस्तकांनी गोळ्या झाडल्या असाव्या, असा संशय आहे. कुख्यात पिन्नू पांडेसोबत सुमित ठाकूरचा गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यांनी एकमेकांवर यापूर्वी हल्लेदेखील केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून सादिक आणि साजीद नामक गुंडांसोबत पिन्नूचा फोनवर वाद सुरू होता. एकमेकांना धमक्या आणि पाहून घेण्याची भाषाही वापरण्यात आली होती. सुमितलाही शिवीगाळ झाली होती. या पार्श्वभूमीवर, सुमितचे साथीदार असलेल्या सादिक, साजीद, मोहसिन आणि ईरफान चाचू या गुंडांनी पिन्नूचा गेम करण्यासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्याचे सांगितले जाते. मात्र, नेम चुकल्याने पाचपैकी एकच गोळी पिन्नूच्या मांडीवर लागली. त्यामुळे तो तसेच धुरिया आणि अन्य एक व्यक्ती जखमी झाले. तिसºया जखमीचे नाव वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.

दोन दुचाक्या, चार आरोपी

गिट्टीखदानचे ठाणेदार राजकमल वाघमारे यांनी आपल्या सहकाºयांसह आरोपीच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहे. दोन दुचाक्यांवर चार आरोपी होते, असा पोलिसांना संशय आहे. त्यातील दोन आरोपी आधी मोटरसायकलवर आले.

त्यांनी पिन्नू कुठे आहे, त्याची शहानिशा करून घेतली. त्यानंतर काही वेळाने अक्टीव्हावर आलेल्या दोघांनी नवनीत बारच्या बाजूला असलेल्या एटीएमजवळ गोळ्या झाडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्याचे पोलीस प्रयत्न करीत आहेत. तर, हा हल्ला सुमित ठाकूरच्या सांगण्यावरूनच त्याच्या गुंड साथीदारांनी केल्याचे पिन्नू यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.

पिन्नूची पार्श्वभूमी वादग्रस्त

गोळीबारात जखमी झालेल्या पिन्नू पांडेची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. चार महिन्यांपूर्वी त्याच्या हाताला गोळी लागली होती. चुकून गोळी सुटली, हाताला लागली, अशी माहिती त्यावेळी पिन्नूने दिली होती. त्याच्या पत्नीनेही त्यावेळी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. पिन्नूवरील गुन्हेगारी अहवाल एकत्र करून पोलिसांनी त्याच्या हद्दपारीची फाईल तयार केली आहे. काही दिवसांतच तसा आदेश निघणार आहे. दुसरीकडे सुमित ठाकूरविरुद्ध यापूर्वी मोक्का, हद्दपारी, अशा कारवाई झाल्या आहेत. तो सध्या वर्धा येथे असल्याची गुन्हेगारी वर्तुळात चर्चा आहे. वृत्त लिहिस्तोवर आरोपींचा छडा लागला नव्हता.