नागपूर : शहरात ‘बर्ड फ्लू’च्या भीतीमुळे चिकनच्या मागणीत ६० टक्क्यांनी घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. शहरात अंडी व चिकनची मागणी जवळपास निम्म्यावर आली असून विक्रीतही घट झाली आहे.
परंतु, आता शहरात कुठेही बर्ड फ्ल्यूचा धोका नसून चिकन तसेच अंडी खाणे सुरक्षित असल्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने केले.शहरातील प्रादेशिक कुक्कुटपालन केंद्रात हजारोच्या संख्येने कोंबड्या दगावल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन करत चिकन खाणे टाळण्याचे म्हटले होते.
या कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक औषधे देण्यास सांगितले तसेच त्यांच्या रक्ताचे नमुने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले होते. या नमुना तपासणीचा अहवाल प्राप्त होताच ज्या कुक्कुटपालन केंद्रात बर्ड फ्लू झाल्याचे आढळले तेथील साडेआठ हजार कोंबड्या मारण्यात आल्या. तसेच १७ हजार अंडी व जवळपास साडेपाच हजार किलो खाद्यही नष्ट करण्यात आले होते.त्यानंतर पासूनच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.