
नागपूर : शहरात पुन्हा एकदा खुनाची थरारक घटना घडली आहे. तलमले वाडी परिसरात भाच्यानं आपल्या काकाचा चाकूने निर्दयी खून केला असून, या हल्ल्याने परिसर हादरून गेला आहे. पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे नागपूर पुन्हा एकदा हादरले आहे.
मृताचे नाव डोमा कृष्णाजी कुंभारे (वय ४६, रा. बालाजी नगर, पारडी लेआउट) असं आहे. तर आरोपी कुणाल देवेंद्र कुंभारे (वय २३, रा. नाईक तलाव, पांचपावली) हा मृताचा सख्खा भाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेचा तपशील –
गुरूवार सायंकाळी डोमा कुंभारे आपल्या दुचाकीवरून जात असताना, भाच्यानं दोन साथीदारांसह त्यांचा पाठलाग केला. तलमले वाडी परिसरात त्यांना अडवून चाकूने सलग वार करत डोमा यांना गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या डोमा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. माहिती मिळताच पारडी पोलिस ठाण्याचे अधिकारी, तसेच क्राइम ब्रांचचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा वेढा घालून तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे.
प्राथमिक तपासात वैयक्तिक वादातून खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.
अलीकडच्या काही दिवसांत नागपूरात सलग खुनांच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, आरोपींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.









