Published On : Fri, Jun 22nd, 2018

क्रूरकर्मा विवेक पालटकर याने महिनाभरापूर्वीच रचला होता कट

Advertisement

नागपूर : सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या नंदनवनमधील मर्डर मिस्ट्रीचा अखेर उलगडा झाला. आर्थिक कोंडी आणि जावयाकडून सतत पैशाची मागणी होत असल्याने त्याच्या हत्येचा कट महिनाभरापूर्वीच रचला होता. १० जूनच्या रात्री हत्या करण्याच्या इराद्यानेच क्रूरकर्मा विवेक पालटकर कमलाकर पवनकरच्या घरात शिरला अन् त्यांची हत्या केली. त्यांच्या डोक्यावर सब्बलचा फटका मारताना बाजूला झोपलेल्या वेदांती आणि कृष्णाच्याही डोक्यावर ती सब्बल लागली. एकाच फटक्यात त्या तिघांना मृत्यूच्या जबड्यात पोहचवले. त्यांच्या किंकाळ्या ऐकून बहीण अर्चना जागी झाली त्यामुळे तिला संपवले. तर, तिची किंकाळी ऐकून वृद्ध मीराबाई जागी झाली. त्यामुळे त्यांचीही हत्या केली, अशी कबुली क्रूरकर्मा विवेक पालटकर याने पोलिसांकडे दिल्याची माहिती सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी आज रात्री पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त श्यामराव दिघावकर आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम उपस्थित होते.

नागपूरच्या इतिहासात आजवरचे सर्वात मोठे हत्याकांड घडवणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाबमधील लुधियाना शहरात जाऊन गुरुवारी, २१ जूनला मुसक्या बांधल्या. सैनिवाल (लुधियाना) पोलीस ठाण्यात त्याच्या अटकेची नोंद केल्यानंतर पोलिसांनी तेथील कोर्टात शुक्रवारी सकाळी हजर केले. त्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात आले आणि तेथून विमानाने नागपुरात आणण्यात आले. हत्याकांड झाल्यापासून तो आरोपीला नागपुरात आणण्यापर्यंतच्या घडामोडींची माहिती सहपोलीस आयुक्त बोडखे तसेच अतिरिक्त आयुक्त दिघावकर आणि उपायुक्त कदम यांनी पत्रकारांना सांगितली. या थरारक हत्याकांडाची पार्श्वभूमी सांगताना आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मौदा तालुक्यातील नवरगावमधील गुलाब पालटकर यांना दोन पत्नी होत्या.

त्यातील छबीला रेखा आणि रंजना तर संध्या नामक पत्नीला विवेक (आरोपी) आणि अर्चना हे दोघे होते. गुलाब पालटकर यांच्याकडे १० एकर शेती होती. त्यातील सव्वादोन एकर शेती त्यांनी दुसरी पत्नी छबीची मुलगी रंजना हिच्या नावे केली होती.

उर्वरित साडेसात एकरवर नराधम विवेकचा ताबा होता. २०१४ मध्ये त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे तो कारागृहात पोहचला. त्यानंतर या शेतीच्या देखभालीची जबाबदारी विवेकचे जावई (अर्चनाचे पती) कमलाकर पवनकर यांनी सांभाळली. शेती सांभाळतानाच आरोपीच्या दोन मुलांची वैष्णवी आणि कृष्णाचीही जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यांना स्वत:च्या घरी आणून त्यांना पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळले. पत्नीच्या हत्याकांडात शिक्षा भोगणाऱ्या आरोपी पालटकरचे अपील उच्च न्यायालयात दाखल करून त्याची न्यायालयाच्या माध्यमातून सुटका करवून त्याला कारागृहातून बाहेर आणण्यातही मोलाची भूमिका बजावली. मात्र, कारागृहातून बाहेर आल्यानंतर आरोपी पालटकर शेतीसह मुलांचा ताबा मिळावा म्हणूनही जावई आणि बहिणीशी वाद घालू लागला. तुझेच काही खरे नाही, तू आधी चांगले घर बनव, काही रोजगार मिळव, त्यानंतर मुलांचा ताबा घे, असे कमलाकर आणि अर्चना पवनकर विवेकला सांगू लागले. दरम्यान, त्याने शेतीचा जबरदस्तीने ताबा घेऊन ती दुसऱ्याला भाड्याने दिल्यामुळे त्याला कारागृहातून सोडवून आणण्यासाठी लागलेला खर्च तसेच मुलांच्या संगोपनावर होणारा महिन्याला पाच हजारांचा खर्च पवनकर दाम्पत्य आरोपी पालटकरला मागू लागले.

त्यामुळे त्यांच्यातील वाद तीव्र झाले. पालटकर एका हॉटेलमध्ये सहा हजार रुपये महिन्याने सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होता. त्यातील पाच हजार रुपये जावई आपल्याला मागत होता. साडेसात एकर शेतीतून सव्वादोन एकर जमीन अर्चनाच्या नावे करून देण्यासाठीही कमलाकरने तगादा लावला होता. तो नेहमी त्यासाठी त्रास देत होता अन् बहीण अर्चनाकडूनही तो वेळोवेळी फोन करून ही मागणी रेटत होता. त्यामुळे त्याच्याबद्दल तीव्र द्वेष निर्माण झाला अन् त्याचमुळे आपण त्याची हत्या करण्याचा कट रचला. म्हणूनच अर्चनाच्या घरापासून काही अंतरावर गिरीपुंजेची रूम भाड्याने घेतली. त्या रूममध्ये कटकारस्थान केले. कमलाकरची हत्या करण्यासाठी तो बाहेर कुठे एकटा मिळतो, त्याची आरोपी वाट बघत होता. मात्र, तो बाहेर मिळत नसल्यामुळे त्याच्या घरातच त्याची हत्या करण्याचे ठरवून १० जूनच्या रात्री सब्बल घेऊन आरोपी तेथे पोहचला. पहाटे ३ च्या सुमारास सर्वजण गाढ निद्रेत असताना त्याने कमलाकरला संपवण्याच्या इर्षेने त्याच्या डोक्यावर आडवी सब्बल मारली.

ती कमलाकरसोबत त्याचा स्वत:चा मुलगा कृष्णा आणि वेदांतीच्या डोक्यावर लागल्याने ते ठार झाले. त्यांच्या किंकाळ्या ऐकून अर्चना जागी झाली त्यामुळे तिला अन् नंतर तिची सासू मीराबाई धावून आल्याने त्यांनाही डोक्यात सब्बलचे फटके मारून संपवल्याची कबुली वजा माहिती आरोपीने दिल्याचे सहपोलीस आयुक्त बोडखे यांनी सांगितले.

थेट गाठली दिल्ली

हे हत्याकांड घडवून आणल्यानंतर आरोपी स्वत:च्या रूममध्ये गेला. तेथून तो सकाळी ९ वाजता बॅग भरून आॅटोने रेल्वेस्थानकावर पोहचला. रेल्वेने त्याने थेट दिल्ली गाठली. तेथून लुधियानाला पोहचला. तेथे एका मजुराला त्याने आपण बाहेरून आलो, येथे खाण्यापिण्याची, राहण्याची सोय नाही. कुठे काम असेल तर सांग असे म्हणत त्याच्या मदतीने लुधियानाच्या सैनीवाल भागातील इंडस्ट्री परिसरात एका कंपनीत काम शोधले. बाजूलाच एका चाळीत दोन मजुरांसोबत चार हजार रुपये महिन्यांची रूम भाड्याने घेतली आणि आरोपी तेथे राहू लागला. विशेष म्हणजे, बारावीनंतर २००८-०९ मध्ये रामटेकच्या आयटीआयमध्ये मशिनिस्टचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर तो मुंबईत गेला. तेथील नार्वेस्ट टेक्सटाईल्समध्ये नोकरी करू लागला. नऊ महिन्यानंतर तो पंजाबमधील अंबाला येथे असलेल्या रेनबो जिन्स टेक्सटाईल्समध्ये कामाला लागला. तेथे वर्षभर काम केल्यामुळे त्याला पंजाबमधील लुधियाना, अंबाला भागाची माहिती होती. तिकडे पळाल्यास पोलीस आपल्यापर्यंत पोहचणार नाही, असा त्याचा गैरसमज होता.