Published On : Sun, Apr 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

शोभायात्रेतून थेट मृत्यूकडे;अथर्व हत्याकांडाने नागपूर पेटलं, दोन संशयित ताब्यात!

पोत्यावरील चिन्हांवरून पोलिसांचा शोध सुरू
Advertisement

नागपूर: गिट्टीखदान परिसरातून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय अथर्व नैनारेचा मृतदेह कळमेश्वर हद्दीत सापडल्याने शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. भरतवाडा परिसरात रिंगरोडलगत एका गोणीत हात-पाय बांधलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

हनुमान जयंतीच्या दिवशी निघालेल्या शोभायात्रेदरम्यान अथर्व अचानक बेपत्ता झाला होता. उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला, मात्र काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर पोलिसांत तक्रार दाखल होताच शोधमोहीम सुरू करण्यात आली.

तपासात समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार अथर्व शेवटचा दोन मित्रांसोबत एका आईस्क्रीम पार्लरजवळ दिसून आला. त्यानंतर तो एकटाच निघून गेला. यानंतर आरोपींनी त्याला अशा मार्गाने नेले जिथे कोणतेही सीसीटीव्ही नव्हते, यामुळे हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याचा संशय बळावत आहे.

मृतदेह ज्या स्थितीत आढळला, त्यावरून आरोपींनी अमानुष मारहाण करत हत्या केल्याचे स्पष्ट होते. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या गुन्ह्यात एकापेक्षा अधिक व्यक्ती सहभागी असाव्यात. तसेच अथर्व आरोपींना ओळखत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

घटनास्थळी सापडलेल्या पोत्यावरील ट्रेडमार्क हा तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरत असून त्यावरून आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, आर्थिक वाद किंवा वैयक्तिक कारणातून ही हत्या झाली असावी, असा कयास व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्तांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. विशेष पथके तयार करून तपासाला वेग देण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सध्या दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात असून, लवकरच या भीषण हत्येचा संपूर्ण उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.