Published On : Sun, Feb 11th, 2018

नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर चौघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Advertisement

नागपूर: नागपूर महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ केलेल्या चार कर्मचाऱ्यांनी आज (रविवार) सकाळी नागपूरमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच या चौघांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. शेतकरी धर्मा पाटील आणि हर्षल रावते यांनी मंत्रालयात आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या असतानाच नागपुरातील आजच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

वर्ष २००२ मध्ये या चौघांना पालिकेच्या सेवेतून बडतर्फ केले होते. त्यांना पालिका प्रशासनाने पुन्हा सेवेत घेतले नाही. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. हे चौघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आत्मदहन करण्यासाठी निघाले होते. त्यातील एकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्नही केला. पोलिसांनी त्याला रोखले. तसेच त्याच्यासह आलेल्या इतर तीन कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

या बडतर्फ कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला नोकरीत पुन्हा घ्यावे, अन्यथा आत्मदहन करु, असा इशारा दिला होता. रविवारी सकाळी हे सर्व एका वाहनाने सिव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ पोहोचले. त्यापैकी एकाने अचानक अंगावर रॉकेल ओतून घेतले, मात्र पोलिसांनी वेळीच त्याला रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.