नागपूर : पावसाळा सुरु झाल्याने शहरात जीर्ण झालेल्या इमारतीचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नागपूर महानगरपालिकेने यासंदर्भात आताच मोहीम हाती घेत जीर्ण इमारती असलेल्या घरमालकांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली. नुकतेच गांधीबाग झोनअंतर्गत असलेल्या नालसाहेब चौक येथे घर.क्र.१५ चे घरमालक अब्दुल हमीद अब्दुल रज्जाक यांचे घर जुने असून त्यांच्या घराचा काही भाग खचला. इमारत जीर्ण झाली असल्याने कधीही पडू शकते.
यासंर्दभातला एकी व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र महानगर पालिकेच्या कनिष्ठ अभियंताने याठिकाणी राहत असलेल्या भाडेकरूंना २५ जूनला नोटीस बजावत घर खाली करण्याचे निर्देश दिले आहे. पालिकेतर्फे हे घर २६ जून म्हणजे आज दुपारी ३.४० वाजता पाडण्यात येणार असल्याची माहिती भाडेकरूंना देण्यात आल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. शहरात अनेक इमारती धोकादायक असून, त्यात हजारांवर नागरिकांचे वास्तव्य आहे.
परंतु महापालिकेकडून दरवर्षी केवळ पावसाळा सुरु झाला की नोटीस देण्याची औपचारिकता पूर्ण केली जात आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना एक दिवस अगोदर नोटीस देण्यात येते. या कठीण परिस्थिती ते लोक कुठे जाणार असा प्रश्नही निर्माण करण्यात येत आहे. तसेच शहरात पाऊस सुरु झाल्यास एखादी धोकादायक इमारत कोसळून मोठी जिवितहानी झाल्यास जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.
सर्वाधिक जीर्ण इमारती गांधीबाग झोनमध्ये –
सर्वाधिक जीर्ण इमारती गांधीबाग झोनमध्ये आहेत. त्यापाठोपाठ मंगळवारी धंतोली आणि लक्ष्मीनगर येथील इमारतींचा समावेश आहे. काही ठिकाणी शिकस्त इमारत पाडण्याची नागरिकांची मागणी असूनही, कारवाई होत नसल्याची माहिती आहे.