नागपूर : शहरातील भांडेवाडी येथे सुरु असलेल्या डंपिंग यार्डमध्ये कचरा संकलन आणि कचरा प्रक्रिया यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. याचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी भांडेवाडी येथील डंपिंग यार्डला भेट दिली. आयुक्तांनी डंपिंग यार्डमध्ये सुरू झालेल्या कचरा संकलनाच्या संपूर्ण प्रक्रियेचे निरीक्षण केले. तसेच कचऱ्याशी संबंधित काम करणाऱ्या कंपन्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णयही घेतला.
‘नागपूर टुडे’ नेही दोन दिवसांपूर्वी याठिकाणी सुरु असलेल्या कचरा व्यस्थापनासंदर्भाच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकला होता.
नागपूर महानगरपालिकेने सुरू केलेल्या सर्व विकासकामांची आणि प्रकल्पांची माहिती महापालिका आयुक्त घेत आहेत. या संदर्भात त्यांनी बुधवारी भांडेवाडी येथील डंपिंग यार्डची पाहणी केली. महापालिकेने सूसबीडी या परदेशी कंपनीसोबत करार केला आहे. या करारानुसार, कंपनीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल. यानुसार वर्षानुवर्षे साचलेल्या या कचऱ्यावर सुसबिड आणि झिग्मा कंपनीकडून काम सुरू करून त्याचे पुनरावलोकन केले जाईल.
नागपूरमध्ये कचरा व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. झिग्मा ग्लोबल एन्व्हायरो सोल्युशन्स आधीच या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करत आहे.आयुक्तांनी त्याचीही पाहणी केली. यामाध्यमातून आरडीएफ, बायो सीएनजी आणि नैसर्गिक खत तयार केले जाणार आहे. आयुक्तांनी केलेल्या तपासणीदरम्यान त्यांना आढळून आले की कंपनी प्रक्रियेनंतर त्या ठिकाणाहून मटेरियल हटवत नव्हती. आयुक्तांनी त्यांना तात्काळ ते हटविण्याचे निर्देश दिले.
यासोबतच भांडेवाडीत येणाऱ्या सर्व ट्रकचे ‘स्कडा’ आणि जीपीएस ट्रॅकिंग करून त्याची माहिती महापालिकेला मिळवून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागपुरात कचरा संकलन आणि प्रक्रियेबाबत सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यामुळे आयुक्तांनी संबंधित विभागांना कचऱ्याशी संबंधित सर्व कंपन्यांच्या कामकाजाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत.