Published On : Tue, Aug 29th, 2017

नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे 9 डबे रुळावरून घसरले, मोठी जीवितहानी टळण्याचे हे आहे कारण…

नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे 9 डबे आणि इंजिन मंगळवारी सकाळी रुळावरून घसरले. सुरुवातीला या दुरांतो एक्सप्रेसचे 5 डबे घसरले असे वृत्त आले होते. टिटवाडा येथे हा अपघात घडला आहे. यात काही प्रवाशी जखमी सुद्धा झाले आहेत. परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे.

अपघाताच्या वेळी सुद्धा पाऊस सुरूच असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. विशेष म्हणजे, देशात रेल्वे अपघाताची 10 दिवसांतील ही तिसरी मोठी घटना आहे.

– आसनगांव-वाशिंद स्टेशनजवळ मंगळवारी सकाळी 6 वाजून 40 मिनटाला हा अपघात घडला आहे. आसपासच्या लोकांनी डब्यांमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. रेल्वे प्रवाशासनाने सुद्धा बचावकार्य सुरू केले असून प्राथमिक माहितीनुसार, काही प्रवाशी जखमी असल्याचे म्हटले जात आहे.
– सेंट्रल रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, अडकलेल्या रेल्वे प्रवाशांना पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
– विदर्भ, अमरावती सेवाग्राम एक्सप्रेस रखडली असून मध्य रेल्वे वाहतुकीचा खोळंबा आहे.
– सुत्रांच्या माहितीनुसार, बचावकार्य करण्यासाठी आणि डबे उचलण्यासाठी किमान 6 ते 9 तास लागणार आहेत.
– अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज लावला जात आहे.
एलएसजी डब्यांमुळे मोठी जीवितहानी टळली…
– नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे एकूण 9 डबे इंजिनसह घसरले आहेत. सामान्य ट्रेन आणि डबे असते, तर जीवितहानी झाली असती. मात्र, डब्यांचे तंत्रज्ञान एलएसजी असल्याने मोठ्या जीवितहानीचा धोका टळला.
– एलएसजी तंत्रज्ञान हे जर्मनीहून आले आहे. या विशेष तंत्रज्ञानाने बनवल्या जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यांचे वजन सामान्य डब्यांच्या तुलनेत निम्मे असते. त्यामुळे, डीरेलमेंटनंतर होणाऱ्या दुखापतीचा धोका कमी झाला.
– सामान्य रेल्वेचे डबे लोखंडी असल्याने त्यांचे वजन 80 टनाच्या जवळपास असते. मात्र, एलएसजी टेक्नॉलोजीवर आधारित डबे अॅल्युमिनियमने बनवले जात असल्याने त्यांचे वजन 40 ते 45 टन एवढे असते.
– ज्या प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली, ते वरच्या बाकावर झोपले होते. ट्रेन घसरल्याने बसल्यानंतर झटक्यांमुळे ते खाली पडले. जखमींमध्ये त्यांचाच प्रामुख्याने समावेश आहे.

ह्या रेल्वे रखडल्या
विदर्भ एक्स्प्रेस
अमरावती एक्स्प्रेस
सेवाग्राम एक्स्प्रेस
पंचवटी एक्सप्रेस
कल्याण कसारा लोकल रेल्वे वाहतूक सुद्धा विस्कळीत

हेल्पलाईन नंबर CSTM – 022-22694040
हेल्पलाईन नंबर ठाणे – 022-25334840
हेल्पलाईन नंबर कल्याण – 0251– 2311499
हेल्पलाईन नंबर नागपूर – 0712-2564342