नागपूर – नव्वदच्या दशकात प्रत्येकाच्या ओठांवर असलेलं “तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे…” हे अजरामर गीत लिहिणारे नागपूरचे ज्येष्ठ गीतकार जहीर आलम यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने नागपूरच्या साहित्य, संगीत आणि सांस्कृतिक विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. देशभर गाजलेल्या या गीतामागचा शब्दांचा जादूगार मात्र आयुष्यभर नागपुरातील मोमीनपुराच्या एका छोट्याशा घरात साधेपणाने आणि आर्थिक संघर्षात जगत राहिला.
मोमीनपुराच्या अरुंद गल्लीत राहणाऱ्या जहीर आलम यांच्याबद्दल अनेक नागपूरकरांनाही फारशी माहिती नव्हती. ज्यांच्या एका गीताने संपूर्ण देशाला वेड लावलं, तो माणूस आपल्या शहरात अत्यंत सामान्य परिस्थितीत आयुष्य काढत होता, ही बाब अनेकांना ठाऊकच नव्हती.
१९९० च्या दशकात “तुम तो ठहरे परदेसी…” हे गाणं अक्षरशः देशभर धुमाकूळ घालत होतं. पानटपऱ्यांपासून बसस्थानकांपर्यंत आणि गल्लीबोळांपासून हॉटेल्सपर्यंत सर्वत्र हेच गाणं ऐकू येत होतं. गायक अल्ताफ राजा एका रात्रीत स्टार बनले. मात्र त्या गीतामागे शब्दांची ताकद उभी करणारे जहीर आलम प्रकाशझोतात मात्र कधीच आले नाहीत.
विशेष म्हणजे सुरुवातीला हे गाणं कव्वाली गायिका किरण पाटणकर आपल्या कार्यक्रमांमध्ये सादर करीत असत. त्यानंतर अल्ताफ राजाने ते गायले आणि एका म्युझिक अल्बममध्ये त्याचा समावेश झाला. सुरुवातीला अल्बमला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र वर्षभरानंतर “तुम तो ठहरे परदेसी” या नावाने अल्बम पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आणि त्यानंतर इतिहास घडला.
या एका गाण्यामुळे गायक, संगीतकार आणि म्युझिक कंपनीला मोठा आर्थिक फायदा झाला. मात्र गीतकार जहीर आलम यांच्या वाट्याला अत्यंत कमी मानधन आले. एवढं लोकप्रिय गीत लिहूनही त्यांची आर्थिक परिस्थिती बदलली नाही, ही खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती.
नागपुरातील एम्प्रेस मिल मध्ये काम करणारे जहीर भाई मिल बंद पडल्यानंतर आर्थिक अडचणीत सापडले. साहित्य आणि गीतलेखनाची विलक्षण प्रतिभा असूनही त्यांना आयुष्यात स्थैर्य मिळालं नाही. त्यांनी मुंबईत जाऊन ज्येष्ठ संगीतकार नौशाद यांच्यासह अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या, मात्र त्यातूनही त्यांना अपेक्षित संधी मिळू शकली नाही.
एका चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेलं गाणं मोठं गाजलं, पण त्या चित्रपटातील इतर गाणी एका नामवंत गीतकाराची असल्याने “गीतकार म्हणून फक्त माझंच नाव जाईल,” अशी अट घालण्यात आल्याचं सांगितलं जातं. अखेर जहीर आलम यांना केवळ तीन हजार रुपये देण्यात आले आणि त्यांचं गीत दुसऱ्याच नावावर प्रदर्शित झालं.
जहीर भाईंच्या साधेपणाच्या अनेक आठवणी नागपूरकर आज सांगत आहेत. मोमीनपुरातील छोट्याशा घरात बसायलाही जागा नसायची. पाहुणे आले की समोरच्या ओळखीच्या व्यक्तीच्या घरी बसण्याची व्यवस्था ते करायचे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही पाहुणचारात मात्र त्यांनी कधी कमी पडू दिलं नाही. स्वतःची सायकल घेऊन पाहुण्यांना मुख्य रस्त्यापर्यंत सोडायला जाणारे जहीर भाई मनाने मात्र अत्यंत श्रीमंत होते.
त्यांच्या अनेक रचनांमध्ये त्यांच्या आयुष्याचा संघर्ष आणि वेदना उमटत राहिल्या. नागपूरच्या मातीत राहून शब्दांनी देश जिंकणारा हा गीतकार आज काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्यांची गाणी आणि शब्द कायम रसिकांच्या स्मरणात जिवंत राहतील.
नागपुर में शादी का झांसा देकर संबंध बनाने का आरोप #nagpurnews #crime...
महिला शिक्षिका से दुष्कर्म का आरोप, वीडियो बनाकर किया ब्लैकमेल #nagpurnews #crime...
कोचिंग क्लासेस की सुरक्षा जांच की मांग #nagpurnews #coachingclasses #newsupdate #maharashtranews
नागपुर में ड्रग्स माफियाओं पर बड़ी कार्रवाई की तैयारी #nagpurnews #crime #drugs...
नागपुर के प्रजापति चौक फ्लाईओवर पर भीषण सड़क हादसा #nagpurnews #accident #flyover...
मतदाता सूची अद्यतन करने का विशेष अभियान #nagpurnews #matdatasuchi #newsupdate #news









