Published On : Tue, Aug 16th, 2022

पर्यावरण संवर्धनाचे नागपूर मॉडेल ठरणार पथदर्शी : ना. नितीन गडकरी

Advertisement

१७ ई आणि डिजिटल बसचे लोकार्पण

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल झालेल्या १७ ई आणि डिजिटल बसचे स्वातंत्र्यदिनी सोमवारी १५ ऑगस्ट २०२२ रोजी केंद्रीय परिवहन, भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी लोकार्पण केले.

संविधान चौकात आयोजित भव्य कार्यक्रमात आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चिन्मय गोतमारे, अतिरिक्त आयुक्त श्री. दीपक कुमार मीना, श्री. राम जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी आणि इतर मान्यवरांनी लोकार्पीत नवीन बस मध्ये संविधान चौकपासून जीपीओ चौक पर्यंत राईड केली.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, नागपुरात पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. नागपूर देशातील इतर राज्यांना पथदर्शक ठरणार असून नागपूर मॉडेलचा संपूर्ण देशात अभ्यास केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पर्यावरणपूरक ई-बसेससाठी नागपूर महानगरपालिकेचे अभिनंदन करताना ते म्हणाले, ई-बसमुळे मोठी बचत होणार आहे. त्यांनी वायू, पाणी आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. त्यांनी कर्मचाऱ्यांना सुद्धा बस व्यवस्थेला फायद्याची करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, पुढच्या तीन वर्षांत सर्व बसेस पर्यावरणपूरक करण्याचा निर्धार मनपातर्फे करण्यात आला आहे. काही दिवसांत शहर बस वाहतुकीसाठी २३० पर्यावरणपूरक बसेस उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांनी ‘चलो ऍप कार्ड’ चे लोकार्पण केले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले. आभार उपायुक्त रवींद्र भेलावे यांनी मानले.