Published On : Sat, Jun 27th, 2020

नागपूर मेट्रो पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल – पालकमंत्री डॉ. नितिन राऊत

मेट्रो भवनाची पाहणी

Advertisement

नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे ही अन्य महानगरातील मेट्रोच्या तूलनेत अत्याधुनिक असून मेट्रो रेल्वे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. सौर ऊर्जेचा वापर असणारी व ग्रीन मेट्रो असा नावलौकीक मिळविलेली मेट्रो नागपूरच्या विकासातील मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. नितिन राऊत यांनी व्यक्त केला. दीक्षा भूमीसमोरील मेट्रो भवनला आज, पालमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

Advertisement

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, कार्यकारी संचालक (प्रशासन) अनिल कोकाटे, संचालक (वित्त) एस. शिवनाथन, संचालक सुनिल माथूर, संचालक प्रकल्प महेशकुमार व महामेट्रोचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Advertisement

महा मेट्रोचे काम गतीने होत असून झिरो माईल स्टेशनचा अधिक विकास करण्यात यावा, अशी अपेक्षा डॉ. राऊत यांनी व्यक्त केली. सिताबर्डी येथील किल्ल्याच्या ठिकाणी लेजर शो प्रस्तावित असून यासाठी मेट्रोने पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. झिरो माईल हा नागपूरचा एैतिहासिक वारसा असून याठिकाणी झिरो माईल टॉवर उभारण्याबाबत मेट्रोने विचार करावा, असे ते म्हणाले. अंबाझरी येथील जैवविविधता उद्यान विकसित करण्याबाबत मेट्रोने पुढाकार घ्यावा, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, विद्युत विभागाच्या पुढाकाराने कोराडी येथे एनर्जी पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कचे डिझाइन तयार करण्यासाठी मेट्रोने सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

ॲटोमोटीव्ह चौक ते एलआयसी चौकापर्यंत उभारण्यात येणाऱ्या डबल डेकर पुलाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. पाच कि.मी. अंतर असलेल्या या पुलादरम्यान जरीपटका, कमाल चौक व इतवारा अशा बाजारपेठा आहेत. बाजारपेठेच्या ठिकाणी वाहनांची लॅन्डिंग व्यवस्था असावी, असे पालकमंत्री म्हणाले. याबाबत मेट्रो सकारात्मक विचार करेल असे श्री. दीक्षित यांनी यावेळी सांगितले.

मेट्रो भवनाची इमारत पाच मजल्याची असून रेन वॉटर हार्वेस्टिंग व सौर ऊर्जा ही या इमारतीची वैशिष्ट्ये आहेत. या इमारतीत पार्कींगची व्यवस्था भूमिगत असून तळ मजल्यावर मेट्रो प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन रविवारी शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवण्यात येणार असल्याचे डॉ. दीक्षित यांनी सांगितले. दीक्षा भूमीला भेट देणाऱ्या भाविकांना हे प्रदर्शन खुले ठेवावे, असे पालकमंत्री म्हणाले.

महा मेट्रोबाबत कार्यकारी संचालक अनिल कोकाटे यांनी सादरीकरण केले. 8680 कोटी रुपये खर्चाच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पास केंद्र सरकारने 21 ऑगस्ट 2014 रोजी मंजूरी दिली होती. महा मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील 38 स्टेशनचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. प्रत्येक स्टेशनच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल बसविण्यात आले असून सर्वच स्टेशन ग्रीन स्टेशन आहेत. सौर ऊर्जेव्दारे 14 मेगावॅट वीज निर्मिती होणार असून प्रत्येक स्टेशनवर चार्जिंग पॉईंटची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे ईलेक्ट्रिकल वाहनांसाठी मेट्रो स्टेशन चार्जिंग पॉईंट ठरणार आहे.

भविष्यातील प्रकल्प म्हणून महा मेट्रोच्या टप्पा दोनचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने 19 मार्चला केंद्र सरकारला सादर केला आहे. 43.80 कि.मी. लांबीचा हा प्रकल्प 6717 कोटी खर्चाचा आहे. या मार्गावर 32 स्टेशन असणार असून खापरी ते बुटीबोरी, ऑटोमोटीव्ह चौक ते कन्हान, लोकमान्य नगर ते हिंगणा व पारडी ते ट्रान्सपोर्टनगर असा हा 43.80 कि.मी. चा मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. नागपूर मेट्रो ही देशातील अत्याधुनिक आयएसओ नामांकीत मेट्रो असून या मेट्रोला आतापर्यंत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे 11 पारितोषिक मिळाले असल्याचे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement