Published On : Mon, Aug 11th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर-जबलपूर महामार्गावर मानवतेचा मृत्यू; मदत न मिळाल्याने पतीने पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेला!

- सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Advertisement

नागपूर :रविवारी संध्याकाळी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या एका अपघाताने केवळ एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला नाही, तर मानवी संवेदनाही पायदळी तुडवल्या गेल्या. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात प्राणवायूशी झुंज देत पडली असताना, पती अमित यादव हात जोडून मदतीची याचना करत राहिला… पण गाड्यांचे वेगवान चाक थांबले नाहीत, माणुसकीचा हात पुढे आला नाही.

ग्यारसी अमित यादव (वय अंदाजे ३०) या मूळ मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील करनापूर येथील. गेली दहा वर्षे त्या पतीसोबत कोराडी जवळील लोनारा येथे वास्तव्यास होत्या. रक्षाबंधनानिमित्त पती-पत्नी मोटारसायकलवरून लोनाराहून देवलापारमार्गे करनापूरकडे जात होते.

Gold Rate
08 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,01,800 /-
Gold 22 KT ₹ 94,700/-
Silver/Kg ₹ 1,15,800/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दुपारी साडेतीनच्या सुमारास देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरफाटा येथे त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ग्यारसी ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाली. अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस कोसळत होता. जखमी पत्नीला उचलण्यासाठी किंवा मृतदेह हलविण्यासाठी अमितने महामार्गावरील वाहनचालकांकडे हात जोडून मदत मागितली, पण कोणीही थांबले नाही.

शेवटी विवश होऊन त्याने पत्नीचा मृतदेह मोटारसायकलच्या मागे बांधला आणि पावसातच कोराडीच्या दिशेने निघाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. घाबरलेल्या अमितने गाडी थांबवली नाही, मात्र अखेरीस पोलिसांनी त्याला अडवले. मृतदेह ताब्यात घेऊन मेयो रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

उपनिरीक्षक नीलेश शेंडकर यांनी सांगितले की, या अपघाताचा पुढील तपास देवलापार पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.

ही घटना केवळ रस्ते अपघाताची नव्हे, तर समाजाच्या असंवेदनशीलतेची जिवंत साक्ष ठरली. माणसाच्या हाकेला प्रतिसाद देणारे हात थांबले, आणि महामार्गावर मानवतेचा मृत्यू झाला.

Advertisement
Advertisement