
नागपूर : नागपुरातील आमदार निवासाजवळील चौकात एका इसमाने अचानक उंच टॉवरवर चढल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. परिस्थितीची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, इसमाला सुरक्षितपणे खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आमदार निवासाजवळील चौकात हा प्रकार घडला. संबंधित इसम टॉवरवर बराच वेळापासून बसून असल्याचे सांगण्यात येत आहे. टॉवरची उंची अधिक असल्याने तो नेमके काय सांगत आहे किंवा त्याने टॉवरवर चढण्याचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेनंतर चौकात नागरिकांची मोठी गर्दी झाली असून, पोलिसांकडून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाचे कर्मचारी टॉवरवर चढून संबंधित इसमाच्या जवळ पोहोचले असून, त्याला सुरक्षित खाली आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
इसम मानसिकदृष्ट्या त्रस्त असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू असली, तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. टॉवरवर चढण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या पोलिस आणि अग्निशमन दलाचे प्राधान्य त्याला सुखरूप खाली उतरवणे हेच आहे.




