नागपूर:पोलीस विभागाची प्रतिमा मलीन करणारी घटना समोर आली आहे. अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी नागपुरातील तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली. युपीएससीचा अभ्यास करीत असलेल्या एका 22 वर्षीय तरुणीची छेडखानी केल्याप्रकरणी सायरे यांच्यावर नागपुरात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने अकोला पोलिस विभाग पुन्हा चर्चेत आला.
माहितीनुसार, नागपुरातील नंदनवन भागात राहणाऱ्या एका 22 वर्षीय युवतीची धनंजय सायरे यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी ही युवती यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत होती. दरम्यान, या ओळखीतून धनंजय सायरे यांनी या युवतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने नकार दिल्यावर छेड काढत विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवतीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी धनंजय सायरे यांच्याविरुद्ध भादवि कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहे.