नागपूर:शहरातील फिल्म निर्मात्याची तीनशे कोटीचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अमित परमेश्वर धुपे (वय 44 वर्ष, रा. रडके ले आऊट, एमआयडीसी. हिंगणा रोड) असे फसवणूक झालेल्या निर्मात्याचे नाव आहे.
माहितीनुसार, अमित धुपे हे ७ हॉर्स इंटरमेंट या कंपनीचे मुख्य संचालक आणि एक फिल्म निर्माता आहे. आपल्या आगामी फिल्मची निर्मीती करण्याकरीता त्यांना फायनान्सची आवश्यकता होती, त्यासंदर्भात त्यांची भेट आरोपी दिलीप पांडुरंग वानखेडे (रा. डाबकी रोड, अकोला) यांच्याशी झाली होती.
आरोपीने आश्वासन दिले की, ते त्यांना आधी २ कोटी रूपये व त्यानंतर राजकीय नेत्यांच्या माध्यमातून ३०० कोटी रूपयापर्यंत फायनान्सची सोय करून देतील. खोटे आश्वासन देवून त्यांनी अमीत धुपे यांच्याकडून प्रोसेसिंग फी च्या नावाखाली ३० लाख रूपये घेतले. त्यानंतर अमीत धुपे सतत विचारपूस करीत असतांना आरोपीने टाळाटाळ करण्याला सुरवात केली.
धुपे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच
त्यांनी नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्याशी संपर्क साधला. सिंगल यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी विषयाची गंभीरता लक्षात घेत काईम ब्रांच युनिट २ च्या सिनियर पीआय शुभांगी देशमुख यांच्याकडे हे प्रकरण सोपविले.
देशमुख यांनी तात्काळ प्रकरणाच्या चौकशीला सुरवात करून आरोपीचे मोबाईल ट्रेस करून आरोपी वानखेडे याच्या राहत्या घरी जावून त्याला अटक केली. त्यानंतर आंबाझरी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक विनायक गोल्हे यांनी प्रकरणाची सविस्तर चौकशी करून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.