नागपूर : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांचा नवीन कामठी परिसरात पर्दाफाश झाला आहे. मक्याच्या टरफलाचा वापर करून कृत्रिम रंगांच्या मिश्रणातून हळद, मिरची आणि धणे पावडर तयार केली जात असल्याचा प्रकार घोरपड गावात उघडकीस आला. नवीन कामठी पोलिसांनी या संशयित कारखान्यावर छापा टाकून कारवाई सुरू केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश अंधाळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घोरपड परिसरातील कंपनीची तपासणी केली. यावेळी मक्याच्या टरफलामध्ये कृत्रिम रंग मिसळून मसाल्यांची निर्मिती केली जात असल्याचा संशय आढळून आला. ही युनिट यशोधरा नगर येथील रहिवासी योगेंद्र नरेंद्र केसर्वानी (55) यांच्याकडून चालवली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रकरणाची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणात पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे.




