नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून बारावीचा यंदाचा सरासरी निकाल हा 93.37 टक्के लागला आहे.तर एकट्या नागपूर विभागाचा बारावीचा निकाल ९२.१२ टक्के इतका लागला असून उत्तीर्णतेच्या टक्केवारीत राज्यात सातव्या स्थनावर नागपूर विभाग आहे.
यंदा राज्यातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेसाठी तीन लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी तीन लाख २९ हजार ९०५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३७ हजार २२६, आयटीआयसाठी चार हजार ७५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ९२.६० टक्के मुलगे, तर ९५.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
विभागीय मंडळनिहाय निकाल-
कोकण – ९७.५१ टक्के , पुणे – ९४.४४ टक्के, नागपूर – ९२.१२टक्के ,छत्रपती संभाजीनगर – ९४.०८ टक्के,मुंबई – ९१.९५ टक्के,कोल्हापूर – ९४.२४ टक्के,अमरावती – ९३.०० टक्के, नाशिक – ९४.७१ टक्के, लातूर – ९३.३६ टक्के निकाल लागला आहे.