Published On : Sat, Feb 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात अल्पवयीन मुलांची वेठबिगारी उघड, झगमगत्या ‘आलिशान’मागे काळोख; प्रशासनाची धावपळ!

Advertisement

नागपूर : शहरात प्रतिष्ठेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ‘आलिशान’ कपड्यांच्या ब्रँडमागे सुरू असलेला बालकांचा छळ आणि गुलामगिरीचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने नागपूर हादरले आहे. बिहारमधून आमिष दाखवून आणलेल्या अल्पवयीन मुलांना इतवारीतील एका युनिटमध्ये कोंडून ठेवत त्यांच्याकडून रात्रंदिवस कपडे शिवण्याचे काम करून घेतले जात होते.

जिल्हा महिला व बालविकास विभाग, कामगार विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या संयुक्त पथकाने गुरुवारी (५ फेब्रुवारी) गांधीबाग परिसरातील नासिर क्रिएशन्स येथे छापा टाकला. या कारवाईत सहा अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली. यातील दोन मुले अवघी १३ वर्षांची असून उर्वरित चार मुले १६ ते १७ वर्षे वयोगटातील आहेत. प्राथमिक तपासात या मुलांना बंधूआ मजुरांप्रमाणे ठेवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

छापा पडलेल्या ठिकाणी मुलांना मूलभूत सुविधा न देता त्यांच्याकडून दिवसरात्र काम करून घेतले जात होते. तयार होणारा कपड्यांचा साठा थेट ‘आलिशान’च्या दुकानांमध्ये पाठवला जात असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली. पथकाने संपूर्ण कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण करत मुलांचे जबाब नोंदवले आहेत.

या प्रकरणी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असली, तरी सुरुवातीला केवळ नासिर क्रिएशन्सचा मालक मोहम्मद नासिर अन्सारी याच्यावरच गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी वेठबिगारीचे कलम लावले नसल्याने बाल कल्याण समितीने तीव्र नाराजी व्यक्त करत तत्काळ हस्तक्षेप केला. समितीने या प्रकरणात बंधूआ मजुरी प्रतिबंधक कायद्यान्वये कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

Advertisement

प्रकरणाचे धागेदोरे ‘आलिशान’च्या व्यवस्थापनापर्यंत पोहोचताच संबंधित वर्तुळात मोठी धावपळ सुरू झाल्याची चर्चा आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांनी ‘आलिशान’च्या संचालकांचा या प्रकरणातील सहभाग तपासला जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पीडित बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कोणतीही तडजोड करणार नसल्याचा इशारा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी दिला आहे.

शहरातील झगमगाटाच्या आड दडलेली ही बालकांची वेठबिगारी व्यवस्था आता उघड झाली असून, दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.