Published On : Wed, Jul 1st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर क्राईम ब्रँचची कारवाई; राष्ट्रीय महामार्गावर 50 किलोहून अधिक गांजा जप्त, ट्रक चालक अटकेत

Advertisement

नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NDPS Squad) मोठी कारवाई करत भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून तब्बल 50 किलो 560 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एका ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून, जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 27 लाख 79 हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

30 जून 2026 रोजी दुपारी 2.40 ते सायंकाळी 7.10 वाजण्याच्या दरम्यान पर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमिया कॉम्प्लेक्ससमोरील वनउत्पादन तपासणी नाक्यावर अंमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. यावेळी सहा चाकी अशोक लेलँड ट्रक चालकाची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली.

NDPS कायद्यातील सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि पंचांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेतली असता, ट्रकच्या केबिनमध्ये लपवून ठेवलेला 50 किलो 560 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह ट्रक आणि एक ओप्पो मोबाईल फोन जप्त केला.

या प्रकरणात मोहम्मद अलाउद्दीन मोहम्मद जमालुद्दीन शराफत अली मलिक (वय 40), रा. माडा क्वार्टर्स, कपिलनगर, नागपूर याला अटक करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यातील ओडिशातील संबलपूर येथील एका फरार संशयिताचा शोध पोलीस घेत आहेत.

Advertisement

या प्रकरणी पर्डी पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या कलम 8(C), 20(B) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंमली पदार्थांची तस्करी नेमकी कुठून सुरू होती आणि यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे, याचा तपास नागपूर गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.