Published On : Wed, Oct 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

काँग्रेसमध्ये सतीश चतुर्वेदींच्या बंडखोरीची चर्चा; भाजपच्या कोहळेंच्या प्रचारातील उपस्थितीने राजकीय वर्तुळात खळबळ!

Advertisement

Auto Draftनागपूर : काँग्रेसमध्ये नुकतेच पुनरागमन केलेले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी हे भाजप-महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारात उघडपणे सक्रिय झाले आहे. भाजप पदाधिकारी डॉ. राजेश गादेवार यांनीही हे उघडपणे जाहीर केले.

काँग्रेसने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी अभिजीत वंजारी यांना उमेदवारी दिली असताना, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचे नाव थेट भाजपच्या प्रचारमेळाव्याशी जोडले गेल्याने नागपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हिंगणा रोडवरील दिगडोह हिल्स येथील प्रियादर्शनी कॅम्पसमध्ये भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ प्राध्यापक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याबाबत डॉ. राजेश गादेवार यांनी प्रसारित केलेल्या संदेशात सतीश चतुर्वेदी यांच्यासह राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची नावे नमूद करण्यात आली आहेत. यात काँग्रेसमध्ये दाखल झालेले चतुर्वेदी यांचे नाव समोर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.त्यामुळे ही बाब केवळ राजकीय चर्चेपुरती मर्यादित न राहता काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरली आहे.

काँग्रेसचा उमेदवार मैदानात, ज्येष्ठ नेत्याचे नाव भाजपच्या प्रचारात-
नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी निवडणूक लढवत असताना, त्याच निवडणुकीतील प्रतिस्पर्धी भाजप उमेदवाराच्या प्रचारमेळाव्यात सतीश चतुर्वेदी यांचे नाव समोर येणे हा काँग्रेससाठी राजकीय पेच ठरू शकतो. नुकतेच पक्षात पुनरागमन केलेल्या नेत्याच्या या भूमिकेमुळे काँग्रेसमधील समन्वय आणि पक्षशिस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

काँग्रेस नेतृत्व काय भूमिका घेणार-
भाजप पदाधिकाऱ्यानेच प्रसारित केलेल्या संदेशातून ही बाब समोर आल्याने प्रकरणाला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश मिळाल्यानंतर सतीश चतुर्वेदी यांची भूमिका पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराशी कितपत सुसंगत आहे, याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणी काँग्रेस नेतृत्व त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागणार का, पक्षशिस्तीच्या दृष्टीने कारवाई करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेससमोर आता केवळ प्रतिस्पर्ध्यांशी लढण्याचेच नव्हे, तर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकेबाबतही स्पष्टता आणण्याचे आव्हान उभे राहिले आहे. सतीश चतुर्वेदी यांची अधिकृत प्रतिक्रिया आणि काँग्रेस नेतृत्वाचा निर्णय या प्रकरणातील पुढील राजकीय घडामोडींची दिशा ठरवणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.