नागपूर: शहरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात महिला सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना उघड झाली आहे. कॉमर्स विभागातील एका सहाय्यक प्राध्यापकाने विद्यार्थिनीला तसेच महिला प्राध्यापिकांना अनुचित वर्तनाचे मेसेज पाठविल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकारानंतर महाविद्यालय परिसरात मोठी घडामोड घडली.
संबंधित विद्यार्थिनीने कुटुंबीयांशी ही बाब शेअर करताच त्यांच्या नातेवाईकांनी संतापाच्या भरात महाविद्यालयात धाव घेतली. प्राचार्यांकडे तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नाही, असा नातेवाईकांचा दावा असून त्यामुळेच त्यांनी संतप्त होऊन आरोपी प्राध्यापकाला महाविद्यालयातच धारेवर धरले.
नातेवाईकांचे म्हणणे आहे की कॉमर्स विभागातील या प्राध्यापकाने अश्लील वा अनुचित मजकूर असलेले मेसेज पाठवून विद्यार्थिनीचा छळ केला. विशेष म्हणजे हा प्राध्यापक 2023 पासून या महाविद्यालयात कार्यरत असून, महाविद्यालयाच्या वरिष्ठ व्यवस्थापनातील एका व्यक्तीशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने हे प्रकरण दाबून ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही समोर आला आहे.
काही माजी विद्यार्थ्यांनीही यापूर्वी याच प्राध्यापकाविरोधात इतर महाविद्यालयात विद्यार्थिनींकडून तक्रारी झाल्याचे सांगितले. त्या वेळी त्यांच्या सेवेतून त्यांना मुक्त करण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय 2023 मधील भरती प्रक्रियेत मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीतून त्यांची नियुक्ती झाल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.
घटना घडली त्या वेळी प्राचार्य संविधान दिनाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नातेवाईकांनी आग्रह केला तरीही प्रशासनाने योग्य प्रतिसाद दिला नाही, असा त्यांचा आरोप आहे. उलट तक्रार घेण्यासाठी आलेल्यांनाच पोलिसांचा राग दाखवून दडपण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर नागपूर शहरातील पालकवर्ग आणि विद्यार्थी समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे. एक नामांकित शैक्षणिक संस्थेत असे प्रकार उघडकीस येणे अत्यंत लज्जास्पद आणि गंभीर असल्याचे पालकांनी व्यक्त केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही या महाविद्यालयावर दोन महिला प्राध्यापिकांच्या विनयभंगाच्या प्रकरणामुळे वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा अशाच प्रकाराने महाविद्यालय चर्चेत आले असून, आरोपी प्राध्यापकावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.









