
नागपूर : पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनपाच्या कर निरीक्षकाला कथितरीत्या जातिवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मनपाचे कर निरीक्षक सुरज मोहन स्वामी यांच्या तक्रारीवरून प्रमोद भागचंदानी याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, सुरज स्वामी हे आशी नगर झोन क्रमांक ९ येथे कर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. २१ सप्टेंबर रोजी कार्यालयाकडे जात असताना प्रमोद भागचंदानी याने त्यांना पाहून कथितरीत्या शिवीगाळ केली आणि जातिवाचक अपशब्द वापरले. यावेळी अपमानास्पद भाषा वापरण्यासोबतच धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
या तक्रारीच्या आधारे पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सध्या आरोपीला अटक झालेली नसून, या प्रकरणात पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही प्रमोद भागचंदानी आणि त्याच्या एका ट्रान्सपोर्टर साथीदाराविरोधात मनपा कर निरीक्षकाला कथित जातिवाचक शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात दोघांना अंतरिम जामीन मिळाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता भागचंदानीविरोधात पुन्हा गुन्हा दाखल झाल्याने प्रकरण चर्चेत आले आहे.




