Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात पारंपरिक उत्सवांसाठी करण्यात आलेल्या २ कोटी रुपयांच्या तरतुदीवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती समाधानकारक नसताना उत्सवांसाठी एवढ्या मोठ्या निधीची तरतूद करण्यामागील उद्देश काय, असा सवाल काँग्रेसचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी केला.
नागपुरातील पारंपरिक उत्सव दरवर्षी विविध मंडळे आणि नागरिकांच्या सहभागातून साजरे केले जातात. त्यामुळे महापालिकेने राखीव ठेवलेला निधी नेमका कशासाठी आणि कशा पद्धतीने खर्च केला जाणार, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणी महाकाळकर यांनी केली.
या निधीतून नागरिकांना नेमका काय सार्वजनिक लाभ मिळणार, तसेच उत्सवांचे नियोजन करताना संबंधित मंडळांचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात का घेण्यात आले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.




