Published On : Thu, Nov 16th, 2017

कोलंबोतील ‘सिटी नेट काँग्रेस’ आणि जर्मनीतील सीओपी२३ परिषदेत महापौर नंदा जिचकार यांनी केले नागपूरचे प्रतिनिधित्व


नागपूर: संयुक्त राष्ट्राच्या इकॉनॉमिक ॲण्ड सोशल कमिशन फॉर एशिया ॲण्ड द पॅसिफिक (यूएनईएससीएपी) तर्फे श्रीलंकेतील कोलंबो येथे आयोजित ‘सिटी नेट काँग्रेस’मध्ये तसेच जर्मनीतील बॉन येथे आयोजित यूएनएफसीसीसी सीओपी२३ परिषदेत रेक्सकॉमच्या सदस्य म्हणून महापौर नंदा जिचकार यांनी सहभागी होऊन नागपूरचे प्रतिनिधित्व केले.

इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ लोकल एनव्हिरॉन्मेंटल इनिशिएटिव्ह साऊथ एशिया (आयसीएलईआय) आणि प्रादेशिक जीआयझेड शहरी नेक्सससह २०१६ पासून नागपूरमध्ये ‘आशियायी शहरी नेटवर्क्समधील एकात्मिक संसाधन व्यवस्थापन’ या प्रकल्पाची अंमलबजावणी करीत आहे. ‘शहरी नेक्सस’ या प्रकल्पाचा उद्देश नागपूरमध्ये नागरी विकास नियोजन प्रक्रियेमध्ये एकीकृत दृष्टीकोन अवलंबिणे व प्रोत्साहन देणे हा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विशेषत: पाणी, ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे.

श्रीलंकेतील कोलंबो येथे ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान ‘सिटी नेट काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशातील शहरांमधील सदस्य, सहयोगी सदस्य आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे सुमारे ३०० प्रतिनिधी सहभागी झालेले होते. यात पीअर-टू-पीअर लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे शहरातील महापौर, नागरी नेते आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी एकत्र येऊन ऊर्जा, पाणी आणि अन्न या क्षेत्रातील योजना आणि व्यवस्थापन प्रक्रिया एकत्रित करण्यासाठी “नेक्सास” दृष्टिकोन कसा लागू केला जाऊ शकतो याबाबत चर्चा केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूरच्या नागरी विकास प्रश्नांवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून कसे सहकार्य करता येईल, याबाबत महापौर नंदा जिचकार यांनी माहिती घेतली. यामुळे आता नागरी विकासासंदर्भात असलेल्या संधींचा लाभ मिळविण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करता येईल.

जर्मनीतील यूएनएफसीसीसी सीओपी२३ परिषदेत सहभाग
जर्मनीतील बॉन येथे १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित यूएनएफसीसीसी सीओपी२३ परिषदेमध्येमध्ये आयसीएलईआयच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रादेशिक कार्यकारी कमिटी (REXcom) सदस्य म्हणून महापौर नंदा जिचकार सहभागी झाल्या होत्या.

६० पेक्षा अधिक देशांतून सरकारच्या सर्व स्तरांमधील ३३० पेक्षा अधिक स्थानिक आणि प्रादेशिक नेते असे एकूण एक हजार प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते. यामध्ये १०० पेक्षा अधिक इव्हेंट, गोलमेज चर्चा, पत्रपरिषद आणि डिजिटल संवाद अशा विविध टप्प्यात परिषदेचे आयोजन होते. सीओपी परिषदेत हवामान समतोलात अग्रेसर असणाऱ्या शहरांतील प्रतिनिधी मानवी वसाहत समावेशक, सुरक्षित, लवचिक आणि शाश्वत करण्याच्या दृष्टीने संधी शोधत होते. हवामान समतोल राखण्याकरिता जागतिक उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने परिषदेने महत्त्वाची भूमिका निभावली. महापौर नंदा जिचकार यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा एक भाग म्हणून नागपूरमध्ये भविष्यासाठी नियोजित करण्यात येत असलेल्या विविध निम्न कार्बन उत्सर्जनाच्या प्रकल्पांवर विशेष निवेदन केले. सौर शहराच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात आलेल्या नागपूरमधील योजना, ऊर्जा कार्यक्षम रस्त्यांवरील वीज आदींवर त्यांनी चर्चा केली. महापौर नंदा जिचकार यांच्या या परिषदेतील उपस्थितीने हवामान समतोल राखणाऱ्या शहरांच्या प्रतिनिधींनी नागपूरमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले.

‘रेक्सकॉम’ (REXcom) सदस्य
नागपूरच्या महापौर नंदा जिचकार इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ लोकल एनव्हिरॉन्मेंटल इनिशिएटिव्ह (साऊथ एशिया) च्या विभागीय कार्यकारी समितीवर (REXcom) निवडून आल्या आहेत.


रेक्सकॉम (REXcom) हे दक्षिण आशिया मध्ये आयसीईएलआयचे प्रादेशिक प्रतिनिधित्व करते. दक्षिण आशियातील सर्व आयसीईएलआय सदस्यांनी संस्थेसाठी मार्गदर्शक शक्ती म्हणून काम करण्यासाठी आणि कृतीचा अग्रक्रम ठरविण्यासाठी मतदान केले आहे.

आयसीईएलई दक्षिण आशियाच्या रेक्सकॉमसाठी झालेल्या निवडणुकीत नागपूरच्या महापौर नंदा जिचकार उमेदवार होत्या. सन २०१८ ते २०२१ या कालावधीसाठी त्या निवडून आलेल्या आहेत.

नागपूर गेल्या दहा वर्षांपासून नागपूर आयसीएलईआय सदस्य असून आयसीईएलई दक्षिण आशिया सोबत नवीनीकरणीय ऊर्जा आणि संसाधन कार्यक्षमता प्रकल्पांमध्ये कार्यरत आहे ज्यामध्ये शहरी नेटवर्कवरील एका चालू प्रकल्पाचाही समावेश आहे. या प्रकल्पात शहरातील खाद्यान्न, पाणी आणि ऊर्जेची आंतरजोडणी पाहत आहे.

रेक्सकॉमकरिता ऑनलाईन मतदान करण्यात आले होते. यामध्ये दक्षिण आशियामधून ४१ सदस्यांनी मतदान केले. भारताला या निवडणुकीत दुसरे सर्वाधिक म्हणजेच २८ मते मिळाली. मतदानाची प्रक्रिया महिनाभर सुरू होती. ६ ऑक्टोबर रोजी मतदान बंद करण्यात आले. निकाल १३ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला.