Published On : Thu, Aug 30th, 2018

नागपूर मध्यवर्ती कारागृह?… नव्हे, सृजनस्वातंत्र्याचे मुक्त विद्यापीठ!

Advertisement

नागपूर: चारपाच जण एमबीएची तयारी करीत आहेत.. तर दोघेतिघे रेडिओ जॉकीचे काम करीत आहेत… फिक्कटल्या भिंतींवर काहीजण मनमोहक रंगांची व सुबक आकारांची चित्रे काढण्यात गुंतले आहेत.. बागकामाची आवड ज्यांना आहे ते नर्सरीची देखभाल करण्यात गढून गेले आहेत… कुणी कार वॉशिंगचे तर कुणी लॉन्ड्रीचे काम सांभाळत आहे.. काही स्त्रिया ब्युटीकल्चरचा अभ्यासक्रम संपवून सॅनिटरी नॅपकिन्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

तर काहींना बेकींगची आवड असल्याने त्या बेकींगचा कोर्स करीत आहेत. दुसरीकडे नेहमीच्याच कामांसोबत तांत्रिक कामही काहीजण आवडीने शिकून घेत आहेत.. रोजगार मिळवून देणारे अनेक अभ्यासक्रम, जगात कुठेही गेलं तरी स्वत:च्या पायावर उभे राहता येईल असे उपक्रम, ज्याला जे आवडेल ते त्याने शिकावे व काम सुरू करावे. कुठल्याच विशिष्ट वयाची अट नाही की पूर्व अनुभवाची गरज नाही अथवा महागड्या फीची धास्ती नाही..

काय आहे हे? कुठले शैक्षणिक केंद्र?

हे आहे सृजनशीलतेचे मुक्त विद्यापीठ. आणि त्याचा पत्ता विचाराल तर तो आहे, नागपूरचे मध्यवर्ती कारागृह.

हो. उन्हातान्हात खडी फोडणे किंवा सुतारकाम-वीणकाम करणे… फारफार तर लोहारकाम एवढीच आपली कल्पनाशक्ती बंदिजनांच्या कामाच्या संदर्भात विस्तारते. मात्र झपाट्याने तंत्रस्नेही झालेल्या जगाची हवा या बंदिजनांना न लागली तरच नवल. त्यामुळे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात डोकावले तर चकित होऊन जावं असा बदल दिसून येतो आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकार व टाटा ट्रस्ट यांच्यादरम्यान झालेल्या करारानुसार, नागपूर, मुंबई, नाशिक आणि पुणे येथील मध्यवर्ती कारागृहांमध्ये विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम तर सुरू करण्यात आले आहेत.

स्त्री व पुरुष या दोन्ही बंदिजनांसाठी नागपूर कारागृहात सुरू असलेल्या एकूण उपक्रमांची यादी बरीच मोठी आहे. आधीपासून चालत असलेल्या लाकूडकाम, लोहकाम, बागकाम, विणकामाच्या जोडीला येथे पार्लर ट्रेनिंग, सॅनिटरी नॅपकिन्सचे उत्पादन, शिवणकाम, रेडिओ जॉकी, चित्रकला प्रशिक्षण, मफलर प्रशिक्षण, पेपरबॅग प्रशिक्षण, प्रथमोपचार ट्रेनिंग, कार वॉशिंग, लॉन्ड्री, नर्सरी असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत.

हे बंदिजन जर बाहेरच्या जगात असते तर कदाचितच त्यांनी यापैकी कशाचे ट्रेनिंग घेतले असते व त्यात ते पारंगत बनले असते. मात्र शिक्षेची मुदत पूर्ण करत असलेल्या या बंदिजनांमधील कलागुणांना वाव देणे व त्यातून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा हेतू या मागे असल्याने त्यांना विविध क्षेत्रांचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले.

कारागृहात एक रेडिओस्टेशन आहे. तेथून बंदिजनांच्या फर्माईशीनुसार व अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून गाणी ऐकवली जातात. येथे रेडिओ जॉकीचे कामही बंदिजनांकडूनच केले जाते. त्यांच्यातील ज्यांना या कामाची आवड आहे ते हे काम लीलया सांभाळतात.

हातमागाचे कापड, साडी, चादरी येथे विणल्या जातात. यात खड्डामाग हा एक वेगळा प्रकार पहावयास मिळतो. येथील स्त्री व पुरुष बंदिजन यावर सुरेख सुती साड्या विणतात. या साड्यांची विक्री कारागृहाच्या दुकानात केली जात असते.

गेल्याच वर्षापासून येथे सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याची यंत्रे लावण्यात आली. येथील महिलांना तसे प्रसिक्षण दिले गेले. आता दिवसभरात साधारणपणे ५०० नॅपकिन्स तयार केले जातात. यात दोन प्रकार केले आहेत. सॅनिटरी नॅपकिन्सचा हा प्रयोग राज्यात प्रथमच केला गेला आहे. येथे तयार झालेले नॅपकिन्स राज्यातील विविध कारागृहांकडे पाठविले जातात. त्याची अद्याप बाहेर विक्री सुरू केलेली नाही. मात्र लवकरच तीही सुरू होण्याची शक्यता आहे.

नागपूर कारागृहातील ८ बंदिजनांनी मुक्त विद्यापीठातून एमबीएची तयारी केली आहे. एका बंदिजनाने टूरिझमचा कोर्स पूर्ण केला आहे. अनेकजण पदवीचे शिक्षण घेत आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून येथील बंदिजनांनी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा वसाच जणू घेतला आहे. मेकोसाबाग चित्रकला महाविद्यालयाच्या सहकार्याने येथील काही बंदिजनांनी चित्रकलेची इंटरमिजिएट ही परिक्षाही दिली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मदतीने येथील बंदिजनांना कायदेविषयक मार्गदर्शनही करण्यात येत असते.

कारागृहाच्या भिंती या रंग उडालेल्या किंवा कुठल्यातरी गडद वा फिक्क्या रंगात असतात या समजाला छेद देणारी एक बाब येथे घडून आली आहे. येथील भिंतींवर वेगवेगळी निसर्गचित्रे चितारण्यात आली आहेत. अनेक बंदिजन त्यांच्या कामाच्या वेळेत या भिंतींवर सुबक चित्रे काढण्यात गढून गेलेले पाहता येतात.
नागपुरात खुले कारागृह आहे. यात बंदिजन चार भिंतींच्या बाहेर येऊन काम करू शकतात. खुल्या कारागृहात शेती केली जाते. गेल्या वर्षी या शेतीतून ३५ क्विंटल तांदूळ घेण्यात आला. नागपूर रोटरी क्लबच्या मदतीने पेपर बॅग्ज तयार करण्याचे प्रशिक्षण महिला बंदिजनांना देण्यात आले. त्यामुळे येथे सुंदर डिझाईन्सच्या पेपरबॅग्ज विक्रीस ठेवलेल्या असतात. रेड क्रॉस सोसायटीच्या मदतीने प्रथमोपचाराचे प्रसिक्षण देण्यात आले. यात लहानसहान अपघात, किरकोळ जखमांवरील प्रथमोपचार शिकवला गेला.

कारावासातून पुनवर्सनाकडे
आपली शिक्षा संपवून एखादा बंदीजन जेव्हा कारागृहाबाहेर येतो तेव्हा त्याचे आधीचे जग बरेच बदलून गेलेले असते. त्याचे वयही वाढलेले असते. अशात त्याला नोकरी मिळणे अवघड असते. त्याला आपल्या उपजिवीकेसाठी एखाद्या व्यवसायाचाच आधार घ्यावा लागतो. असे रोजगाराभिमुख प्रशिक्षण कारागृहातूनच घेऊन तो बाहेर आलेला असतो. ज्यामुळे त्याला लवकरच आपले नवे आयुष्य सुरू करता येते. हीच बाब महिला बंदिजनांच्या बाबतीतही असते.

कित्येकदा या स्त्रियांना त्यांचे कुटुंबिय स्वीकारण्यासाठी तयार नसतात. अशावेळी त्यांच्या निवासाची व पोटापाण्याची व्यवस्था करण्याच्या हेतूने काही स्वयंसेवी संस्थांसोबत मेळ घालून मदत केली जाते. एखाद्या स्त्रीला रोजगारासाठी शिलाई यंत्र दिले जाते. कधी तिला घरभाडे दिले जाते तर कधी तिच्या पुढील शिक्षणासाठीही मदत केली जाते. केवळ शिक्षा देऊन पुरेसे नसते. तर त्यांना पुन्हा नव्या विचारांनी व नवे आयुष्य सुरू करताना जी काही प्रारंभिक मदत लागेल ती कारागृह प्रशासनातर्फे दिली जाते.

ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे शिक्षण मिळते आहे.. जिथे महिला बंदिजनांच्या लहानग्या बाळांची काळजी घेतली जाते आहे.. जिथे पुरुष बंदिजनांना कारागृहाबाहेर जाऊन काम करण्याची व मिळकतीची संधी दिली जाते… त्याला कारागृह म्हणतानाही मग जरा कचरायला होते. केवळ ते तिथे काही काळाकरिता बंदिस्त राहणार असतात, एवढेच त्यातले वास्तव मग उरते.

पुनवर्सनासाठी कारागृह प्रशासनाने पुढे केलेला हात हा महिला बंदिजनांच्या बाबतीत तर फार संवेदनशील आहे. एकादी महिला आपली शिक्षा संपवून परत जाणार असेल तर तिला तिच्या घरापर्यंत जाण्यासाठी गाडी दिली जाते. जेणेकरून तिला बाहेर पडल्यानंतर आता घरी कसे जावे वा तशा स्वरुपाचे प्रश्न पडणार नाहीत. तिला घर नसेल वा घरचे लोक तिला परत घेण्यास तयार नसतील तर तिला एखाद्या महिला संस्थेच्या वसतीगृहात समाविष्ट केले जाते. तिच्या रोजगारासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.

भले कारागृहाच्या भिंतींपलिकडचे जग सध्या त्यांच्या नजरेसमोर नसो, भलेही त्यांच्या आप्तस्वकीयांपासून ते दूर असो किंवा त्यांच्या कारावासाची शिक्षा प्रदीर्घ असो.. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाच्या १२५ एकरच्या बंदिस्त जागेत राहणाऱ्या या बंदिजनांचे शिक्षणाचे आकाश तर नक्कीच खुले आहे.

कारागृह अधीक्षक राणी भोसले
नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले या आहेत. त्या २०१७ पासून या कारागृहाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या कारकीर्दीत सॅनिटरी नॅपकिन्स, ओपन लॉन्ड्री हे दोन उपक्रम सुरू करण्यात आले. महिला बंदिजन असो वा पुरुष, त्यांनी या ठिकाणाहून योग्य प्रशिक्षण घेऊन येथून बाहेर पडल्यावर आपले उर्वरित आयुष्य सन्मानाने व आनंदाने जगावे यासाठी कारागृह प्रशासन अधिक जागरुक असल्याचे त्या सांगतात. बंदिजनांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणे व त्यानुसार कारवाई करणे यावर त्यांचा नेहमी भर असतो. कारागृहात सुरू करण्यात आलेल्या नवनवीन उपक्रमांमुळे बंदिजनही आनंदी होत आहेत. त्यांच्यात सकारात्मक मानसिकता रुजते आहे असा त्यांचा अनुभव आहे.