
नागपूर : नागपुरात गोवंशांची अवैध वाहतूक आणि कथितरित्या कत्तलखान्यात पाठवण्याच्या तयारीत ठेवलेल्या गोवंशांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. मोमिनपुरा आणि नेरी येथे झालेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी तब्बल 23 गोवंशांची सुटका करून त्यांना गौशाळेत सुरक्षित पोहोचवले.
मोमिनपुरातील अन्सार नगर येथील अब्बू मियां मशिदीजवळ तहसील पोलिसांनी संशयित बोलेरो पिकअप (MH-49-D-1326) अडवून तपासणी केली. वाहनात 8 गोवंशांना दोरखंडाने बांधून दाटीवाटीच्या अवस्थेत नेले जात असल्याचे आढळले. पोलिसांनी सर्व गोवंशांची सुटका केली.
या कारवाईत 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 80 हजार रुपयांचे गोवंश आणि 3 लाख 50 हजार रुपयांच्या पिकअपचा समावेश आहे. याप्रकरणी भूषण उर्फ रणजीत महादेव रामटेके याला अटक करण्यात आली असून मो. शरीफ कुरेशी आणि मो. शाहबाज कुरेशी यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, नेरी गावातील नागोबा मंदिराजवळील शेतात 15 गोवंशांना दोरखंडाने बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व गोवंशांची सुटका केली. पोलिसांच्या माहितीनुसार, स्थानिकांनी या गोवंशांना सुमारे दोन दिवस पुरेसे चारा-पाणी देण्यात आले नसल्याचे सांगितले. सुमारे 2 लाख 80 हजार रुपये किमतीच्या 15 गोवंशांना ताब्यात घेऊन गौशाळेत पाठवण्यात आले. याप्रकरणी नवीन कामठी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



