नागपूर : जरीपटका पोलिस ठाणे हद्दीत धान्य व्यापाऱ्यावर गोळीबार करून रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीला गुन्हेशाखेने अवघ्या काही दिवसांत गजाआड केले. या कारवाईत चार आरोपींसह तब्बल २१ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यात दोन कार, तीन दुचाकी, देशी बनावटीचे माऊझर पिस्तूल, जिवंत काडतुसे, मोबाईल आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे.
घटना कशी घडली?
१० सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास व्यापारी राजीव रूपचंद दिपानी (वय ४७) हे त्यांच्या अॅक्टिव्हा गाडीने घरी जात असताना, काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींपैकी एकाने माऊझरमधून तीन फायर करून दिपानी यांना जखमी केले व त्यांच्या एअरबॅगमधील रोख रक्कम हिसकावून आरोपी पसार झाले.
तपासाची धडाकेबाज मोहीम-
घटनेनंतर पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांच्या आदेशावरून गुन्हेशाखेच्या सात पथकांची नेमणूक करण्यात आली. गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी राज्याबाहेर पळून गेल्याचे लक्षात आले. मात्र, ते पुन्हा नागपुरात परतल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली.
अटक केलेले आरोपी-
- सिमरजितसिंग संतासिंग संधु (वय ४०, पंजाब)
- शेख हुसेन उर्फ जावेद शेख (वय ३७, नागपूर)
- अब्दुल नावेद अब्दुल जावेद (वय ३३, नागपूर)
- सय्यद जिशान सैयद रेहमान (वय ३२, नागपूर)
तसेच इतर सहा साथीदारांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
पूर्वनियोजित गुन्हा-
आरोपींनी व्यापाऱ्याच्या हालचालींवर पाळत ठेवून दरोड्याची आखणी केली होती. यासाठी त्यांनी चोरीच्या वाहनांचा वापर केला. घटनेनंतर लुटलेली रक्कम आपापसात वाटून सर्व आरोपी शहराबाहेर गेले होते.
पोलिसांची कामगिरी-
या कारवाईत पोनि कमलाकर गड्डीमे यांच्या नेतृत्वाखाली अनिल ताकमांडे, संदीप बुआ, नितीन बुलपार, नवनाथ देवकाते, मधुकर काठोके, विवेक शिंगरे आदींनी विशेष भूमिका बजावली. पुढील तपास जरीपटका पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.