
नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीआधी भाजपमधील अंतर्गत नाराजीचा उद्रेक झाला आहे. सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर होताच माजी आमदार गिरीश व्यास यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत बंडखोर उमेदवार प्रा. अनिल सोले यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे नागपूर भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
पक्षाकडून कारवाई होण्याची वाट न पाहता आपण स्वतः राजीनामा दिल्याचे व्यास यांनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर अनिल सोले यांच्या प्रचारासाठी महाल परिसरातील स्वतःचे कार्यालय उपलब्ध करून देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. या कार्यालयातून सोले यांच्या प्रचाराची मुख्य मोहीम राबविण्यात येणार आहे.
गिरीश व्यास हे भारतीय जनसंघाचे माजी संस्थापक अध्यक्ष पंडित बच्छराज व्यास यांचे पुत्र असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनी २०१६ ते २०२२ या काळात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.
उमेदवारीवरून सुरू झालेला असंतोष आता उघड बंडात बदलल्याने भाजपसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. जुन्या कार्यकर्त्यांवरील अन्यायाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर व्यास यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



