
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास अंबाझरी तलावाजवळील स्वामी विवेकानंद स्मारक परिसरातून MH 49 CD 8390 क्रमांकाची कार जात होती. कार वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्यावरील बॅरिकेट्सला जोरदार धडक देत खाली नाल्यात कोसळली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने कारचे नुकसान झाले असून, या दुर्घटनेत एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातग्रस्त वाहनातून बचावकार्य आणि पुढील कार्यवाही करण्यात आली. मृत व्यक्तीची ओळख, कारमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या तसेच अपघात नेमका कशामुळे घडला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले की वाहनात तांत्रिक बिघाड झाला, यासह अपघाताच्या विविध शक्यतांचा पोलीस तपास करत आहेत. शहरात वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



