नागपूर : राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील कर्करोग रुग्णांना अत्याधुनिक उपचार सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाकेअरच्या माध्यमातून नागपुरात ‘नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट’ ही उपकंपनी स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाकेअर संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या प्रकल्पामुळे विदर्भासह ग्रामीण भागातील रुग्णांना आधुनिक कर्करोग निदान व उपचारासाठी मोठ्या शहरांचा प्रवास करण्याची गरज कमी होणार असून वेळ आणि खर्चाचीही बचत होणार आहे.
बैठकीत महाकेअरच्या कॉर्पस निधीसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून 100 कोटी रुपयांची तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. तसेच सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधी उभारणी, जी.टी. रुग्णालय परिसरात महाकेअर कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, लेखापरीक्षक व कंपनी सचिवांची नियुक्ती आणि विविध तज्ज्ञ सल्लागारांच्या नियुक्तीलाही मंजुरी देण्यात आली.
राज्यातील कर्करोग उपचार अधिक सक्षम करण्यासाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि वैद्यकीय कौशल्याचा लाभ राज्यातील रुग्णांना मिळणार आहे.
नागपूरनंतर मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, नाशिक आणि अमरावती येथेही अशा सुविधा उभारण्याचा सरकारचा मानस असून राज्यभर कर्करोग उपचारांचे सक्षम जाळे उभारण्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे.





