नागपूर – नागपूरमध्ये बारावीच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित विषयांच्या पेपरफुटी प्रकरणात पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. परीक्षा केंद्रासाठी देण्यात आलेल्या अतिरिक्त लिफाफ्याचा गैरवापर करूनच प्रश्नपत्रिका फोडण्यात आल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप बाबुराव सराटकर (वय ४६) हा चरणदास प्राथमिक शाळेत शिक्षक असून जयताळा येथील विद्यासाधना कॉन्व्हेंट हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा संचालक आणि अध्यक्ष आहे. आपल्या पदाचा गैरफायदा घेत त्याने हा गैरप्रकार केल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सराटकरने त्याच संस्थेतील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यावर दबाव टाकून त्याच्याकडून मदत घेतली. संबंधित कर्मचाऱ्यानेच सर्वप्रथम प्रश्नपत्रिका उघडून बाहेर पाठवल्याचे समोर आले आहे.
नियमांनुसार, प्रश्नपत्रिका २५ प्रतींच्या सीलबंद लिफाफ्यांमध्ये पाठविल्या जातात. प्रत्येक २५ लिफाफ्यांमागे एक अतिरिक्त लिफाफा आपत्कालीन परिस्थितीसाठी दिला जातो आणि तो विद्यार्थ्यांसमोरच उघडणे बंधनकारक असते. मात्र, सराटकरने परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे अर्धा तास आधीच हा अतिरिक्त लिफाफा बेकायदेशीरपणे उघडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
यानंतर शिपायाच्या व्हॉट्सॲप खात्यावरून प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते कोचिंग क्लासच्या संचालकांकडे पाठवण्यात आले. काही वेळातच ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली असून तपास अधिक गतीने सुरू आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये काही शिक्षक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी तसेच एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपपत्र येत्या आठवड्यात न्यायालयात दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.









