Published On : Wed, Apr 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपाडा हत्याकांड; २७ वर्षांच्या सूडातून वृद्धाची निर्घृण हत्या, नागपुरातून दोन आरोपीला अटक

Advertisement

मुंबई : नागपाडा परिसरात ७८ वर्षीय इकबाल इब्राहिम सेलिया यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. ही हत्या कोणत्याही ताज्या वादातून नव्हे, तर तब्बल २७ वर्षांपूर्वीच्या सूडातून घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. मुंबई क्राइम ब्रँचने मुख्य आरोपी सादिक जावर आणि त्याचा साथीदार नौशाद मिठानी यांना नागपुरातील ताजबाग परिसरातून अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, २० एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६:४५ वाजता, इकबाल सेलिया घरात एकटे असताना दोन हल्लेखोरांनी घरात घुसून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर २० हून अधिक वार करण्यात आले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. नंतर कुटुंबीय घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

तपासात उघड झाले की मुख्य आरोपी सादिक जावर हा कुख्यात गँगस्टर सादिक कालिया याचा पुतण्या आहे. १९९९ मध्ये दादर येथे झालेल्या एन्काउंटरमध्ये त्याच्या काकाचा मृत्यू झाला होता. त्या कारवाईसाठी इकबाल सेलिया हेच मुखबिर होते, असा संशय जावरला होता. याच संशयातून त्याने सूड उगवण्यासाठी ही हत्या घडवून आणल्याचे समोर आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, सादिक कालिया हा १९९० च्या दशकात छोटा शकील टोळीचा सक्रिय शार्पशूटर होता. दादर येथे १९९९ मध्ये झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला होता. त्या वेळी सादिक जावर केवळ दोन वर्षांचा होता; मात्र मोठा होत असताना त्याच्या मनात सूडाची भावना निर्माण झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

Advertisement

दरम्यान, आरोपींनी हत्येपूर्वी परिसराची रेकी केली होती. गुन्हा केल्यानंतर दोघेही मुंबईतून फरार झाले आणि एंटॉप हिल, विद्याविहार, कल्याण मार्गे खासगी वाहनाने नागपुरात पोहोचले.

मुंबई क्राइम ब्रँचने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीद्वारे आरोपींचा माग काढत अवघ्या चार दिवसांत नागपुरातील बडा ताजबाग परिसरातून त्यांना अटक केली. चौकशीत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सध्या या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू असून, या कटात आणखी कोणी सहभागी होते का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.