नागपूर: नागपूर महानगरपालिका व एसबीबीएम सोशल फाऊंडेशनच्या वतीने मानकापूर येथील डिविजनल स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे आयोजित ऑल इंडिया इन्विटेशनल कराटे चॅम्पियनशीप अंतर्गत आयोजित कराटे स्पर्धेतील महापौर चषकावर नागपूरच्या वॉरिअर्स कराटे क्लबने १२५ गुणांसह आपले नाव कोरले. या संघाला सर्वसाधारण विजेता म्हणून घोषित करण्यात आले.
वॉरिअर्स कराटे क्लबला १२ सुवर्ण, ११ रौप्य तर २२ कांस्य पदक प्राप्त झाले. नागपूरच्या अनुक्रमे डायनॉमोस कराटे अकादमीने १२४ गुणांसह उपविजेतेपद तर चॅम्पियन कराटे क्लबने १२३ गुणांसह दुसरे उपविजेतपद प्राप्त केले. डायनॉमोस कराटे अकादमीने १० सुवर्ण, १२ रौप्य आणि १९ कांस्य तर चॅम्पियन कराटे क्लबने १४ सुवर्ण, पाच रौप्य आणि १९ कांस्य पदक प्राप्त केले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपाचे क्रीडा सभापती नागेश सहारे, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, जुल्फेकार अहमद भुट्टो, उपायुक्त रवींद्र देवतळे, नाथे पब्लिकेशनचे संजय नाथे, आर्यमन बिल्डर्सचे संचालक संदीप देशमुख, रोटरीचे उपाध्यक्ष निशिकांत काशीकर, वीर बजरंग संस्थेचे संस्थापक श्रीकांत आगलावे, मानवाधिकार व सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष धर्मेंद्र देशमुख, विनय बोधे, नरेंद्र कटारे, एसबीबीएम फाऊंडेशनचे संस्थापक अश्विन अंजीकर, डायनॉमोस कराटे अकादमीचे देविश कटारे उपस्थित होते.
बक्षीस वितरण समारंभापूर्वी प्रमुख पाहुण्यांसाठी खास प्रदर्शनी सामना खेळविण्यात आला. वारिअर्स-डायनॉमोस विरुद्ध ईस्टर्न कराटे क्लब मध्ये झालेल्या या सामन्यात वॉरिअर्स-डायनॉमोसने ३ विरुद्ध २ गुणांनी बाजी मारली.
बक्षीस वितरण समारंभात बोलताना महापौर नंदा जिचकार यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. नागपूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या या स्पर्धेला खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल खेळाडूंचे त्यांनी आभार मानले. क्रीडा सभापती नागेश सहारे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी विविध वजन गटात विजेत्या ठरलेल्या खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कार व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेत १२ राज्यातील ७०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांच्या नेतृत्वात क्रीडा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच एसबीबीएम सोशल फाऊंडेशन, डायनॉमोस कराटे अकादमीच्या प्रतिनिधींनी सहकार्य केले.
