Published On : Tue, May 5th, 2020

नागपूरकरांच्या संयमाला, सेवाकार्याला सलाम!

Advertisement

महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली कृतज्ञता : ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद

नागपूर: कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर मागील दीड महिन्यांपासून नागपुरात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन काळात नागपूकरांनी संयमाचे दर्शन घडविले. या काळात गरजू, गरीब, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हजारो हात सरसावले. कुठल्याही संकटकाळात नागपूरकर एक आहेत, हे दाखवून दिले. नागपूर महानगरपालिकेनेही कार्यक्षेत्राच्या पलिकडे जाऊन सेवेचा आदर्श घालून दिला. नागपूरकरांच्या संयमाला, सेवाकार्याला, एकजुटीला, प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यतत्परतेला या शहराचा महापौर या नात्याने सलाम करतो, या शब्दात महापौर संदीप जोशी यांनी कोरोना योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज (ता. ४) ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागपूरकरांशी संवाद साधत या काळात नागपूरकरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. नागरिकांच्या सहकार्यामुळेच इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा नियंत्रणात असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, लॉकडाऊनदरम्यान जे लोकं अडचणीत आहे, ज्यांना आरोग्य विषयक समस्या, शंका आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना मदत हवी आहे त्यांच्यासाठी यासोबतच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी नागपूर महानगरपालिकेने हेल्पलाईन सुरू केली आहे.

वैद्यकीय शंका, समाधानासाठी आजपर्यंत ३४०१ कॉल आलेत तर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचे २३६९ कॉल मदतीसाठी आले. यामाध्यमातून १०८९ रेशन कीट, ९१ फूड पॅकेटस्‌, पाच ज्येष्ठ नागरिकांना औषधी पुरविण्यात आल्या. ५८५ ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे समुपदेशन करण्यात आले. परराज्यातील मजूर आणि भिक्षा मागणाऱ्यांसाठी २३ बेघर निवारे तयार करण्यात आले. १५८४ क्षमता असलेल्या या निवाऱ्यांमध्ये १४४७ व्यक्ती वास्तव्यास आहेत. या बेघर निवाऱ्यांचे संचालन करणाऱ्या आणि भोजन पुरविणाऱ्या सामाजिक संस्थांचा नामोल्लेख करीत त्यांचे आभार मानले. याव्यतिरिक्त फुटपाथवरील नागरिक, गरजू, विद्यार्थी, नोकरीसाठी नागपुरात वास्तव्यास असलेले व्यक्ती आदींना समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिका अन्नदान करीत आहे.

या संस्थांचाही नामोल्लेख करीत त्यांच्याप्रती कृतज्ञता महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली. आतापर्यंत नागपूर महानगरपालिकेने या समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत १२ लाख ३५ हजार ६५ फूड पॅकेटस्‌ आणि ६६७० रेशन किट्‌स वितरीत केल्या असून ७२ बेबी फूड पॅकेटस्‌चे वितरण केले. हे सेवाकार्य प्रशासकीय यंत्रणेसोबत ज्यांच्या-ज्यांच्या माध्यमातून झाले, त्या सर्वांनी कोव्हिड-१९ विरुद्धच्या लढाईत मोठी भूमिका निभावली आहे. यासोबतच आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि संपूर्ण यंत्रणा, स्वच्छतादूत आदींच्या कार्याला तोड नाही. काही युवकांनी सॅनिटायझर टनेल बनविले तर काहींनी ऑटोमॅटिक हॅण्डवॉश मशीन तयार केली. एका चिमुकलीने तिच्या पिगी बँकमधील पाच हजारांवर रुपये या कोव्हिड-१९ विरुद्धच्या लढाईसाठी दान केले. अशी अनेक उदाहरणे आहे. ज्यांनी घरात राहून लॉकडाऊनला सहकार्य केले, त्यांचेही योगदान मोठे असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

‘फेसबुक लाईव्ह’ दरम्यान अनेक नागरिकांनी प्रश्न विचारले. लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढेल काय, वाईन शॉप सुरू होतील काय, एमआयडीसीतील काही उद्योग सुरू झालेत, नागपूरहून काही व्यक्ती तेथे जातात, त्यांचे काय, राज्याने दिलेले निर्देश नागपुरात का लागू करण्यात आले नाहीत, अशा अनेक प्रश्नांची बरसात नागरिकांनी केली. यावर महापौर संदीप जोशी यांनी समर्पक उत्तरे दिलीत. राज्याने जरी काही निर्देश जारी केले असले तरी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मनपा आयुक्तांना अधिकार देण्यात आले आहेत. त्या अधिकारांच्या आधारे मनपा आयुक्तांनी जर काही निर्णय घेतले असतील तर ते सर्व नागरिकांना बंधनकारक असतीलच. त्यात दुमत नाही. या निर्बंधामुळेच नागपूरची परिस्थिती आज नियंत्रणात आहे. लोकांना रोजगार नाही, उद्योग बंद आहे, रोजचे कमावून खाणाऱ्यांची हालत गंभीर आहे, लोकांना आता काम हवे आहे, त्यामुळे थोडी शिथिलता यावी, असे मलाही वाटत असले तरी जे काही निर्णय आपल्या शहरासाठी घेण्यात आले आहे, ते चांगल्या भविष्यासाठी घेण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

माजी महापौर प्रवीण दटके यांनी जारी केलेल्या एका व्हिडिओनुसार आयुक्तांनी टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्ग काढावा, यावर आपले मत काय, या प्रश्नाच्या उत्तरात महापौर संदीप जोशी म्हणाले, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके हे भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आहेत. त्यांची जी भूमिका आहे, तीच माझीही भूमिका आहे. यासंदर्भात आयुक्तांसोबत लवकरच चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांनी आता कुठलाही संभ्रम ठेवू नये. १७ मे पर्यंत लॉकडाऊनचे पूर्वीसारखेच पालन करण्यात यावे. आजपर्यंत नागरिकांनी जो संयम पाळला, तसाच संयम काही दिवस ठेवावा असे म्हणत घरीच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.