आमदार मोहन मते यांचा विश्वास : दक्षिण नागपूरमध्ये प्रचारसभांचा झंझावात
नागपूर : नेहमी दुर्लक्षित राहिलेल्या विदर्भाला मागील ५ वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर दिले. विकासकामांनी नागपूरसह संपूर्ण विदर्भाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम दोन्ही नेत्यांनी केले आहे. पण मागील वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने विदर्भातील विकासाला खीळ लावण्याचे काम सुरू केले आहे. या सरकारच्या सूड भावनेला वैदर्भीय पदवीधर येत्या १ डिसेंबरला चोख उत्तर देणार आहेत. पुढे संदीप जोशी विधानपरिषदेत पदवीधरांचे प्रतिनिधित्व करीत ना. नितीन गडकरी व ना. देवेंद्र फडणवीस यांच्या विकास कार्याचा वसा पुढे नेतील, असा विश्वास दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी व्यक्त केली.
भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांनी रविवारी (ता.२९) दक्षिण नागपूरमध्ये झंझावाती प्रचारसभा घेतल्या. यावेळी ते बोलत होते.
विविध ठिकाणी झालेल्या प्रचार सभेमध्ये आमदार मोहन मते यांच्यासह मनपाचे स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, भाजप दक्षिण नागपूरचे अध्यक्ष देवेन दस्तुरे, उपाध्यक्ष संजय ठाकरे, नगरसेविका दिव्या धुरडे, नगरसेविका उषा पॅलेट, नगरसेविका मंगला खेकरे, नगरसेविका कल्पना कुंभलकर, नगरसेविका स्वाती आखतकर, नगरसेविका लीला हाथीबेड, नगरसेविका विद्या मडावी, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, नगरसेवक भगवान मेंढे, नगरसेविका रूपाली ठाकुर, परशु ठाकुर, नेहा लघोटी, शशांक खेकरे, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर सचिव ॲड.राहुल झांबरे, गजानन शेळके, जयंत झाडे, मधुकर राउत, आशिष मोहिते, अमोल बिचकुले, विजय आसोले, भूषण गायधने आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार मोहन मते म्हणाले, मागील ५८ वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे पदवीधर मतदार संघामध्ये वर्चस्व आहे. या ५८ वर्षामध्ये आतापर्यंत काँग्रेसकडून थेट पक्षाचा उमेदवार देण्यात आला नाही. फक्त समर्थनाची भूमिका पक्षाने घेतली होती. आता राज्यात तिघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर कुणातरी रिंगणात उतरवायचे म्हणून उमेदवार काँग्रेसने दिला. मात्र संधी देताना उमेदवाराच्या कर्तृत्वाकडे काँग्रेसला लक्षच देता आले नाही. आता निवडणुकीत दाखवायला कुठलेही काम नसल्याने विरोधक जातीचे कार्ड वापरत आहेत. सुशिक्षित पदवीधर मतदारांनी जातीपातीच्या भूलपाथांना बळी न पडता विकासाला आणि कर्तृत्ववान नेतृत्वालाच आपले पहिले पसंतीक्रम द्यावे, असे आवाहन आमदार मोहन मते यांनी यावेळी केले.
उमेदवारांच्या कार्यअहवालाची तुलना करूनच निर्णय घ्या : संदीप जोशी
पदवीधर मतदार संघ हा सुशिक्षित, जाणकार, सुज्ञ लोकांचा मतदारसंघ आहे. आपल्या समस्या, प्रश्न आणि ते सोडविण्यासाठी कुठली आवश्यक कार्यवाही केली जाणे अपेक्षित आहे, या सर्व बाबींचा सखोल अभ्यास पदवीधरांना आहे. या मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार करताना पदवीधरांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना करू शकण्यास आवश्यक कार्याची माहिती देणे अपेक्षित आहे व ते व्हायलाच हवे. मात्र दुर्दैवाने होत नाही. उलट जातीपातीचे राजकारण करण्याचा प्रकार घडत आहे. यामध्ये निर्णय हा पदवीधरांचा आहे. मात्र त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचा कार्यअहवाल पाहुन मगच आपला प्रतिनिधी निवडण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.