
Oplus_16908288
नागपूर : कारला रस्ता देण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाले. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालदारपुरा येथील हजरत बाबा सय्यद कासम दरगाहसमोर एका २० वर्षीय युवकावर अल्पवयीन मुलाने चाकूने हल्ला केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या हल्ल्यात युवकाच्या डोक्याच्या मागील बाजूस तसेच डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी युवकाची ओळख मोमीनपुरा, डोबी नगर येथील अब्दुल समीर खान (२०) अशी झाली आहे. समीर ऑटो डीलचे काम करतो. पोलिसांच्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी समीर फिएट कारने शब्बानी क्लब रोडवरून मोमीनपुराच्या दिशेने जात होता. दरम्यान, दरगाहसमोर एक अल्पवयीन मुलगा रस्त्याच्या कडेला उभा होता.
कार पुढे नेण्यासाठी समीरने त्याला बाजूला होण्यास सांगितले. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. आरोपानुसार, अल्पवयीन मुलाने समीरसोबत शिवीगाळ केली. समीरने विरोध केल्यानंतर त्याने चाकू काढून त्याच्यावर हल्ला केला.
चाकूच्या वारामुळे समीरच्या डाव्या हातासह डोक्याच्या मागील भागाला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्याला तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी समीरच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास गणेशपेठ पोलीस करीत आहेत.




