Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, May 15th, 2019
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  पाणी चोरीविरोधात मनपा उचलणार कडक पावले

  टुल्लु पंप वापरणाऱ्यांवर १६ मे पासून कारवाई : आयुक्तांनी घेतला पाणीसमस्येचा आढावा

  नागपूर शहरावर ओढावणारे जलसंकट लक्षात घेता पदाधिकारी आणि प्रशासनाने युद्धपातळीवर पाणी बचतीचे प्रयत्न सुरू केले आहे. केवळ १० जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने ३० जूनपर्यंत नागपूरकरांना पाणी देता येईल असे नियोजन प्रशासन करीत आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी (ता. १५) मनपाच्या आयुक्त कार्यालय सभागृहात आयुक्तांनी बैठक घेतली. लोकप्रतिनिधी म्हणून चार आमदारही बैठकीला उपस्थित होते. सदर बैठकीत पाणी चोरीविरोधात कडक पावले उचलण्यात येणार असून टुल्लु पंप वापरणाऱ्यांविरोधात गुरुवारपासून (ता. १६) कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी बोलाविलेल्या बैठकीला मनपाच्या स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने यांच्यासह जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मनपातील सत्तापक्ष उपनेते बाल्या बोरकर, वर्षा ठाकरे, मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, मनपाचे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चोपडे, उपविभागीय अभियंता प्रणय नागदिवे, ओसीडब्ल्यूचे एच.आर. व्यवस्थापक के.एम.पी. सिंग, व्यवस्थापक (देखभाल व दुरुस्ती) कालरा यांच्यासह जलप्रदाय विभागाचे सर्व झोनचे डेलिगेटस्‌ उपस्थित होते.

  सदर बैठकीत नागपूर शहराला पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यांमध्ये असलेल्या पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भात माहिती दिली. पाटबंधारे विभागातर्फे नागपूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा केंद्राला देण्यात येणारे पाणी जेवढे देण्यात येते तेवढे पोहचत नाही. त्याची कारणे शोधण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी दिले. नागपूर शहरात अनेकांकडून पाण्याचा अपव्यय होतो. नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेऊन अपव्यय टाळण्याचे आणि पाण्याच्या बाबतीत काटकसर करण्याचे आवाहन केले. कार वॉशिंग सेंटर आणि हॉस्पीटलमध्ये पाण्याचा भरमसाठ वापर होत असल्याचे आढळून येत आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत जोडण्याही असल्याचे उपस्थित आमदारांनी निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात तातडीने अधिकाऱ्यांनी पाहणी करून अशा अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. जनावरे धुणे, अंगणात पाणी टाकणे, गाड्या धुणे यावर पाण्याची उधळपट्टी करू नये, असेही आवाहन आयुक्तांनी केले. २० मे पासून असे नळजोडण्या नियमित करण्याची मोहीम सुरू होत आहे. नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन नळजोडण्या नियमित कराव्यात असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले. मोहिमेदरम्यान पुढाकार न घेणाऱ्या नागरिकांच्या घरात जर अनधिकृत जोडणी आढळून आली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास पोलिसांची मदतही घेण्यात येईल, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

  उपस्थित आमदारांनीही यावेळी पाण्याच्या समस्येवर चर्चा केली. प्रशासन पाण्याच्या नियोजनासंदर्भात घेत असलेले निर्णय नागरिकांनी पाळावेत. पाणी बचतीत नागरिकांनी स्वत: सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी सर्व आमदारांनी केले.

  भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता पुरेसे टँकर उपलब्ध ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. काही वस्त्यांमध्ये मोठे टँकर जात नसतील तर लहान टँकरची व्यवस्था ठेवावी, असेही निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. टँकरसंदर्भातील सर्व माहिती संबंधित लोकप्रतिनिधींना वेळोवेळी देण्यात यावी, असेही निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. १० जूनपर्यंत पाणी साठा उपलब्ध असला तरी तो वाढविण्यासंदर्भात प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. चौराई धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात मध्यप्रदेश शासनाशी बोलावे, अशी विनंतीही राज्य शासनाला करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाने अतिरिक्त २० क्यूसेक्स पाणी द्यावे, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकता भासल्यास प्रकल्पातील मृत जलसाठा वापरण्यासाठी प्रशासनाने चालविलेल्या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने त्यालाही मंजुरी दिल्याची माहिती यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी उपस्थितांना दिली. पाण्याचा अपव्यय टाळणे आणि काटकसर करणे हाच उपाय असून यासाठी नगरसेवकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहनही यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145