Published On : Sat, Apr 18th, 2020

डासांमार्फत होणा-या आजारांच्या प्रतिबंधासाठी मनपाची स्वच्छता मोहिम

Advertisement

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची संकल्पना : नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे पाउल

नागपूर: डासांपासून होणा-या आजारांपासून संरक्षणाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे मोहिम सुरू करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या मोहिमेद्वारे डासांची पैदास होणारी १५ हजार ठिकाणे शोधण्यात आली असून ती बंद करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

शहरातील रहिवासी क्षेत्राजवळ, मोकळ्या जागेत दलदल, कचरा, घाणीमुळे डासांची पैदास होत आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरतात. पावसाळ्यापूर्वीच अशी ठिकाणे शोधून ती बंद करण्याची आवश्यकता आहे. यासाठी मनपा आयुक्तांच्या नेतृत्वात डास निर्मूलनासाठी मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे माती, मलबा टाकून डासांची पैदास होणारी ठिकाणे बंद करण्यात येत आहे. यासाठी रस्त्याच्या बाजूच्या फुटपाथलगतच्या पावसाचे पाणी जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नाल्यांची स्वच्छता सुरू करून त्यामधून निघणारा कचरा, माती याचा वापर डासांची पैदास स्थळे बंद करण्यासाठी केला जात आहे.

शहरातील मुख्य मार्ग आणि अंतर्गत मार्गांच्या बाजूला असलेल्या नाल्या बुजलेल्या स्थितीत असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होउन पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. प्रत्येकच पावसाळ्यात नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेता शहरातील सर्व रस्त्यांच्या बाजूला फुटपाथलगतच्या पावसाचे पाणी जाण्याच्या नाल्यांची स्वच्छताही सुरू करण्यात आली आहे. या स्वच्छतेद्वारे नाल्यांमधून माती व अन्य कचरा काढून प्रवाह मोकळा करण्यात येत आहे. यामधून निघणारी माती डासांची पैदास होणा-या दलदलीच्या ठिकाणी टाकून ती ठिकाणे बंद करण्यात येत आहे. शहरात आतापर्यंत डासांची १५ हजार पैदास स्थळे शोधण्यात आली असून ती बंद करण्यासाठी फुटपाथलगतच्या नाल्यांतील माती, कच-यासह शहरात पडून असलेल्या बांधकाम साहित्य, मलब्याचाही उपयोग केला जात आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग, लोककर्म विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हे कार्य सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे येत्या एक महिन्यात शहराचे चित्र पालटणार आहे.