
मुंबई – महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आज सकाळी मतदानास सुरुवात झाली. सकाळी 7.30 वाजताच अनेक केंद्रांवर मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिसांचा बंदोबस्त, निवडणूक कर्मचारी आणि यंत्रणा पूर्ण तयारीत असतानाच सुरुवातीच्या तासांमध्येच तांत्रिक बिघाडांनी मतदारांना मोठा फटका बसला.
राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर EVM मशीन अचानक बंद पडल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली. मशीन बंद पडताच नागरिक रांगेत उभे राहून प्रतीक्षा करत राहिले, तर काही ठिकाणी तासाभराहून अधिक वेळ मतदानच सुरू होऊ शकले नाही. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असली तरी सकाळच्या वेळेत मशीनमधील बिघाडामुळे मतदानाचा वेग मंदावला.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषद क्षेत्रातील नेताजी प्राशाळेत मतदानाला सुरुवात होताच EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. मशीन बंद पडताच मतदान पूर्णपणे थांबले आणि मतदारांना रांगेत उभे राहूनच वाट पाहावी लागली. कर्मचाऱ्यांकडून मशीन सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी सकाळच्या तासांत मतदारांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली.
मोहोळमधील आठवडी बाजार केंद्रावरही मशीन बंद पडल्याने वातावरण तापले. माजी आमदार रमेश कदम यांनी मतदान केंद्रावर भाजपवर गंभीर आरोप करत EVM मध्ये फक्त भाजपचेच बटण दाबले जात असल्याचा दावा केला. त्यांच्या या आरोपाला भाजप उमेदवार सुशील क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर देत विरोधक पराभवाची भीती दाखवत खोटे आरोप करत असल्याचा आरोप केला. या वादामुळे मतदान केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्येही अनेक केंद्रांवर मशीन बंद पडल्याने मतदान सुरू होण्यासाठी विलंब झाला. चिपळूण शहरातील खेंड मतदान केंद्रावर तर EVM मशीन दोनदा बंद पडल्याने मतदारांचा संयम ढळू लागला. रांगेत उभे असलेल्या नागरिकांना सकाळच्या थंडीमध्ये प्रतिक्षा करावी लागली आणि यामुळे नाराजीचे स्वर उठले.
अक्कलकोटमधील नगरपरिषद मुला–मुलींच्या उर्दू शाळेतील मतदान केंद्रावरही मशीन बंद पडल्याने सकाळच्या सत्रात मतदान ठप्प झाले. मशीन पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागला.
राज्यातील मतदान सुरळीत व्हावे यासाठी प्रशासन सज्ज असतानाही सुरुवातीच्या तासांमध्येच EVM मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदारांचा वेळ वाया जात असून अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात आहे. मशीन पूर्ववत झाल्यानंतरही सकाळचे बिघाड मतदानावर परिणाम करू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.









