Published On : Mon, Dec 23rd, 2019

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी मनपा कटीबद्ध

Advertisement

शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांचे प्रतिपादन : बालकदिन व शिक्षण सप्ताह सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन

नागपूर: विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी नागपूर महानगरपालिका कटीबद्ध आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना भविष्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील व्यासपीठ मिळणार असल्याचे प्रतिपादन शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी केले.

सोमवारी (ता.२३) नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत बालकदिन व शिक्षण सप्ताहाच्या सांस्कृतिक केंद्रिय स्पर्धेचे उद्घाटन कविवर्य सुरेश भट सभागृह येथे करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी, सांस्कृतिक स्पर्धेचे परिक्षक मुकुंद वसुले, निखील टोमणे, मयुरी टोमणे यांच्यासह शाळा निरिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा.दिलीप दिवे म्हणाले, नागपूर महापालिकेद्वारे विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील सप्तगुणांना वाव मिळतो. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील असलेल्या कलांना भविष्यात सांस्कृतिक क्षेत्रात मोठे व्यासपीठ मिळणार आहे, असा विश्वास सभापती प्रा.दिवे यांनी व्यक्त केला.

शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. सर्व शाळांचा झोनस्तरावर सांस्कृतिक स्पर्धा यापूर्वी घेण्यात आल्या. झोनस्तरावरील स्पर्धेतून गटशः प्रथम क्रमांक आलेल्या चमूंना व विद्यार्थ्यांची अंतीम स्पर्धा आज घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. वर्ग १ ते ४ अ गट, वर्ग ५ ते ८ ब गट असे दोन गटात स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे २ ते ४ जानेवारी दरम्यान विद्यार्थ्यांच्या झोनस्तरावर क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहे. ९,१० जानेवारीला प्रथम क्रमांक आलेल्या चमूंच्या केंद्रीय स्पर्धा यशवंत स्टेडीयम येथे घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. माधुरी धवड यांनी सरस्वती स्तवन सादर केले. मान्यवरांचे स्वागत शिक्षणाधिकारी मिश्रीकोटकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मधु पराड यांनी केले.