Published On : Sat, May 28th, 2022

मनपा आयुक्तांनी केली नदी, नाले स्वच्छता कार्याची पाहणी

Advertisement

नागरिकांच्या तक्रारी तात्काळ दूर करण्याचे दिले निर्देश

नागपूर : पावसाळ्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होउ नये, नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये या उद्देशाने पावसाळ्यापूर्वी शहरातून वाहणाऱ्या नद्यांची व नाल्यांची स्वच्छता नागपूर महानगरपालिकातर्फे करण्यात येते. या कामाची मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री. राधाकृष्णन बी यांनी शुक्रवारी (ता.२७) केली व स्वच्छता होत असलेल्या भागातील नागरिकांशी संवाद साधला. आयुक्तांनी नागरिकांच्या तक्रारी तात्काळ दूर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

मनपातर्फे १२ एप्रिल पासून शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा या तिनही नद्यांसह नाल्यांची सफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीचे स्वच्छता कार्य प्रगतीपथावर आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात नदी आणि नाल्याची सफाई पूर्ण करण्याचे प्रयत्न स्वच्छता विभागाचे आहेत. आयुक्तांनी महाराजबाग उद्यानातून वाहणारा नाला, वेस्टर्न कोलफिएल्ड मधीला विकास नगर नाला, फ्रेंड्स कॉलनी येथील नाला, झिंगाबाई टाकली येथील एस.आर.ए. बिल्डिंग मधील पिवळी नदीचा भाग, मानकापूर सदिच्छा कॉलनी येथील नाला आणि राजपूत हॉटेल ते अशोक चौककडे वाहणारा नॉर्थ कॅनलची पाहणी केली. सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (पी.एच.ई.) विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांना स्वच्छतेसंदर्भात निर्देश दिले.

पूल असलेल्या भागांमध्ये पूलाखाली मोठ्या प्रमाणात कचरा असून तो तात्काळ काढण्याबाबत आयुक्तांनी निर्देशित केले. फ्रेंड्स कॉलनी मधील सुद्धा साचलेला कचरा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले. सदिच्छा कॉलनी आणि झिंगाबाई टाकळी येथे नागरिकांशी संवाद साधतांना मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

नाग नदी १७.४ किमी, पिवळी नदी १६.४ किमी आणि पोहरा नदी १३.१२ किमी असे तिनही नद्यांचे एकूण ४६.९२ किमी पात्र स्वच्छ करायचे आहेत. शहरात एकूण २२७ नाले असून नाल्यांच्या संदर्भात नागरिकांच्या कुठल्याही तक्रारी राहू नयेत, नागरिकांकडून नाल्यांमध्ये कचरा टाकू नये यादृष्टीन झोन स्तरावर आवश्यक उपाययोजना करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. नाले स्वच्छता कार्याला सुद्धा गती देण्याचे त्यांनी निर्देशित करतानाच शहरातील कोणत्याही नाल्यावर अस्वच्छता राहणार नाही, प्लास्टिक, कापड, थर्माकोल अशा वस्तूंमुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी स्वच्छता केल्यानंतरही त्यात अस्वच्छता होउ नये यादृष्टीने नागरिकांमध्ये जनजागृती करणे तसेच आवश्यक उपाययोजना करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

यावेळी सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे, विजय हुमणे, झोनचे कार्यकारी अभियंता गिरीष वासनिक, उज्ज्वल धनविजय, विजय गुरुबक्षणी, झोनल स्वच्छता अधिकारी उपस्थित होते.