Published On : Fri, Sep 1st, 2017

गणेश विसर्जनसाठी मनपा प्रशासन सज्ज

Advertisement

नागपूर: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागपूरकरांचा मिळत असलेला उदंड प्रतिसाद बघता यंदा मनपा प्रशासनाने कृत्रिम तलावांच्या संख्येत वाढ केली आहे. ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या गणेश विसर्जनासाठी मनपासुद्धा ‘हायटेक’ झाली असून नागरिकांना जवळचे विसर्जन कुंड शोधण्यासाठी ‘मोरया’ नावाचे ॲन्रॉईड ॲप तयार केले असून गुरुवार ३१ ऑगस्टपासून ते नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे,गेल्या काही वर्षांपासून नागपूर महानगरपालिका प्रशासन स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेत आहे.

यावर्षी नागपूरकर या संकल्पनेला उदंड प्रतिसाद देत आहेत. कुठल्याही नैसर्गिक तलावात गणेश विसर्जन करू नये, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे यापूर्वीच करण्यात आले आहे. सोनेगाव तलाव आणि सक्करदरा तलावांमध्ये गणेश विसर्जन करण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेने शहरातील दहाही झोनमध्ये जागोजागी कृत्रिम तलाव आणि विसर्जन कुंडांची व्यवस्था केली आहे. मागील वर्षी शहरात १५० विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. ही संख्या वाढून यावर्षी १८४ करण्यात आली आहे. १४ ठिकाणी अजून मागणी असून त्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

गणेश विसर्जनासाठी दहा झोनअंतर्गत ठेवण्यात आलेल्या विसर्जन कुंडांमध्ये ६० कुंड सेंट्रींगचे आहेत. ८३ आणि वाढीव १४ असे ९७ कुंड रबरचे आहेत. जमिनीत खड्डे तयार करून ३६ विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहेत तर पाच विसर्जन कुंड स्थायी स्वरूपाचे तयार करण्यात आले आहेत. लक्ष्मी नगर झोन अंतर्गत सोनेगाव तलाव आणि अजनीचौक येथे प्रत्येकी एक, हनुमाननगर झोन अंतर्गत बिंझाणी महाविद्यालयाच्या मैदानात एक, गांधीसागर तलाव येथे एक तसेच मंगळवारी झोन अंतर्गत पोलिस लाईन टाकळी येथे एक अशी 5 स्थायी स्वरूपाची विसर्जन कुंड आहेत.

ॲण्डरॉईड ॲप ‘मोरया’
ही सर्व विसर्जन कुंडे कुठे आहेत, आपल्या घराजवळ कुठले विसर्जन कुंड आहेत, त्याचे लोकेशन काय आहे याची इत्यंभूत माहिती देणारे ‘मोरया’ नामक ॲन्रॉईड ॲप नागपूर महानगर पालिकेने नागपूरकरांच्या सेवेत गुरुवार ३१ ऑगस्टपासून सादर केले. महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. मेघे ग्रुप ऑफ इंस्टिट्युशनस्‌ अंतर्गत असलेल्या नगर विकास संस्थेच्या आतूर नामपल्लीवार, कृणाल नामपल्लीवार, सागर भगत या विद्यार्थ्यांनी संस्थेचे सीईओ डॉ, शेखर भोले, सहायक प्रा. रोहित हिमते यांच्या मार्गदर्शनात तयार केले आहे.

१४ हजारांवर मूर्तींचे विसर्जन
मनपाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक मोहिमेला पसंती देत आतापर्यंत १४ हजार ५०० वर लहान-मोठ्या मूर्तींचे विसर्जन नागपूरकरांनी कृत्रिम विसर्जन कुंडात केले आहे. यामध्ये विसर्जनासाठी 4 फिरत्या वाहनांची व्यवस्था धरमपेठ झोन अंतर्गत करण्यात आली आहे.

स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार
विसर्जन स्थळी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक नागपूर महानगरपालिकेसोबत नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. प्रत्येक विसर्जन स्थळी सदर स्वयंसेवक नागरिकांना कृत्रिम विसर्जन कुंडात मूर्ती विसर्जन करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. निर्माल्य कुंडातच निर्माल्य टाकण्यासाठी नागरिकांना विनंती करीत आहेत. रात्रंदिवस हे शेकडो स्वयंसेवक विसर्जन काळात विसर्जन स्थळांवर हजर असतील. तसेच गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळात व विसर्जन स्थळी स्वच्छ भारत अभियान जनजागृती आणि डेंग्यु व किटकजन्य आजारांबद्दल जनजागृती करण्यात करण्यात आली.

निर्माल्य कलशातच निर्माल्य टाकावे
गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर निर्माल्य विसर्जन स्थळी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कुंडातच टाकण्याचे आवाहन नागपूर महानगर पालिकेतर्फे करण्यात आले आहे. तसेच चार फिरत्या निर्माल्य संकलन रथाद्वारे शहरातील मोठ्या गणेश मंड़ळातील निर्माल्य गोळा करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement